बसमधील आरक्षित जागेवर पुरुष बसतातच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:49 AM2018-05-11T03:49:59+5:302018-05-11T03:49:59+5:30

दादा, बसमधील डावीकडील जागा ही महिलांना बसण्याकरिता आहे. असं जर एखाद्या पुरुषाला सांगितलं तरी हल्ली त्यांचा इगो फार दुखावतो. ज्येष्ठ नागरिकांचे एकवेळ समजू शकतो. पण पुरुष मंडळी, खासकरून महाविद्यालयीन युवक ज्यावेळी जाणीवपूर्वक महिलांकरिता आरक्षित असलेल्या जागेवर बसतात तेव्हा त्यांना काय सांगावे, हा प्रश्न पडतो.

why the man sit in the reserved seats on the bus? | बसमधील आरक्षित जागेवर पुरुष बसतातच का?

बसमधील आरक्षित जागेवर पुरुष बसतातच का?

googlenewsNext

पुणे : दादा, बसमधील डावीकडील जागा ही महिलांना बसण्याकरिता आहे. असं जर एखाद्या पुरुषाला सांगितलं तरी हल्ली त्यांचा इगो फार दुखावतो. ज्येष्ठ नागरिकांचे एकवेळ समजू शकतो. पण पुरुष मंडळी, खासकरून महाविद्यालयीन युवक ज्यावेळी जाणीवपूर्वक महिलांकरिता आरक्षित असलेल्या जागेवर बसतात तेव्हा त्यांना काय सांगावे, हा प्रश्न पडतो. इतकेच नव्हे तर सौजन्याची गोष्ट तर सोडाच, बस काय तुम्हा बायकांनी खरेदी केली का? मी पहिल्यांदा जागा पकडली आहे. काहीही झालं तरी जागेवरून उठणार नाही. अशी अडेलतट्टूची भूमिका घेतात. हा अनुभव आहे बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांचा.
शहरात पीएमपी या सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाºया महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बसमध्ये बसण्यासाठी जागा न मिळाल्याने एखाद्या महिलेची होणारी कुचंबणा, अनेकदा तिला चालत्या बसमधून येणारा अश्लील वर्तनाचा अनुभव, पुरुष प्रवाशांकडून येणारा असंवेदनशीलतेचा प्रत्यय यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिवाजीनगर, येरवडा, खराडी, विश्रांतवाडी, कोथरूड, वारजे, याबरोबरच हिंजवडी, सांगवी, आकुर्डी या भागात कामाकरिता प्रवास करणाºया महिलांची संख्या मोठी आहे. २०१२ पीएमपीच्या वतीने महिलांना बसमध्ये जागेअभावी होणारा त्रास या समस्येवर उपाय म्हणून परिपत्रक काढले होते. त्यावर्षी महिलांच्या तक्रारीत झालेली वाढ यामुळे परिपत्रकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. एखाद्या महिलेने वाहकास बसमध्ये बसण्यास येणारी समस्येची तक्रार केल्यास त्यावर वाहकाने संबंधित पुरुष प्रवाशावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकदा वाहक याकडे टाळाटाळ करतात. यामुळे महिला अशा प्रसंगी बस पोलीस ठाण्यात नेऊन आपली तक्रार नोंदवू शकतात, असे त्या परिपत्रकात म्हटले होते. त्यानुसार काही महिलांनी चक्क पोलीस ठाण्यापर्यंत बस नेल्याची उदाहरणे दिसून आली. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी या गर्दीच्यावेळी महिलांना पुरुष प्रवाशांच्या दांडगाईला सामोरे जावे लागते. बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अंध व्यक्ती यांना विशेष आसनांची व्यवस्था केली असताना काही पुरुष प्रवासी त्या जागेवर अतिक्रमण क रतात. अनेकदा महिला एखाद्या पुरुष प्रवाशांना जागेवर उठून दुसरीकडे बसण्याकरिता विनंती करतात. मात्र, ती विनंती आपला अपमान समजून पुरुष प्रवासी वाद घालू लागत असल्याची तक्रार महिला प्रवासी करतात. वादविवाद करून, मोठ्याने बोलून पुरुष प्रवासी आपलीच बाजू कशी बरोबर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे महिला प्रवाशी सांगतात. बसने प्रवास करण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून मुद्दामहून महिलांकरिता आरक्षित केलेल्या जागेवर बसतात. त्यांना वाहकाने त्यासंबंधी हटकल्यास विद्यार्थी वाहकांशी आणि महिलांशी हुज्जत घालतात. यापेक्षा विदारक परिस्थिती म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांकरिता आरक्षित केलेल्या जागेवर पुरुष प्रवासी मात्र क्वचितच एखाद्या महिला प्रवाशास बसण्यासाठी जागा दिल्याचे दिसून येते.

भांडणे सोडवताना येतात नाकी नऊ

कुणाला काही सांगायचे म्हणजे अवघड काम झाले आहे. वाहक म्हणून काम पाहताना त्याला एकाचवेळी सगळीकडे लक्ष ठेवणे शक्य नसते. अशावेळी महिला, मुली त्यांना जागा न मिळाल्याने तक्रार करतात. वास्तविक, पुरुष प्रवाशांना बसमध्ये महिलांकरिता आरक्षित आसनव्यवस्था अशी सूचना आहे हे माहिती असूनही ते त्या जागेवर बसतात. बरं पुरुषांना काही सांगायला जावे तर ते तुम्ही महिलांची बाजु घेता असे तर महिला तुम्ही पुरुषांना झुकते माप देता असे, आम्हाला सुनावतात. यावर वाहकाने इतर प्रवाशांची तिकिटे काढायची, की ही भांडणे सोडवायची हा प्रश्न पडतो. बसमध्ये केवळ महिला प्रवासी असतात, असे नव्हे तर त्यावेळी ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग व्यक्तींकडे लक्ष द्यावे लागते. हे मात्र महिला आणि पुरुष प्रवाशी लक्षात घेत नाहीत. - एक त्रस्त वाहक, पीएमपी

वाढत्या पुरुषीपणाला चाप लावावा

दरवेळी पुरुषांचे काय म्हणून ऐकून घ्यायचे. बसमधील गर्दीत एकट्या महिला प्रवाशाला काय सहन करावे लागते, याची त्यांना कल्पना नाही. जी जागा महिलांकरिता आरक्षित केली आहे, तिथे पुरुष बसतातच कशाला? अनेकदा पुरुषांकडील जागा रिकामी असतानादेखील मुद्दाम महिलांच्या आरक्षित जागी बसण्याची पुरुषांचा हट्ट असतो. आमचा आवाज चढला तर मुद्द्याची गोष्ट भांडणावर येते. त्यामुळे वाढत्या पुरुषीपणाला चाप लावण्याची गरज आहे.
- सुधा परब, सांगवी

बस खरेदी केली असा भाव

महिलांकरिताच्या आरक्षित जागेत पुरुष प्रवाशांनी बसणे चुकीचे आहे. बºयाचदा महिला प्रवाशी ज्या पद्धतीने वाद घालतात त्यावरून त्यांनी बस खरेदी केली असा भाव दिसून येतो. जी गोष्ट समजुतीच्या सुरात सांगता येते तीच चढ्या आवाजात सांगून त्या इतर प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. अशा प्रसंगी पुरुष रागाच्या भरात काही बोलला तर त्याचे भांडवल केले जाते.
- प्रकाश सूर्यवंशी, आकुर्डी

पीएमपीच्या हेल्पलाईनवर तक्रारी कमी

पुणे : पीएमपीमध्ये डावी बाजू महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असली तरी अनेकदा त्या जागेवर पुरुषच बसलेले दिसतात. त्यांना उठवायचा प्रयत्न केला तर ते दमदाटी करतात असा आजवरचा अनेक महिला, शाळकरी मुली आणि तरुणींचा अनुभव आहे. या संदर्भात वाहकाला सांगूनही अनेकदा कोणतीच कृती होत नाही. त्यामुळे त्यांना गप्प बसावे लागते. मात्र, काही मुली धीटाईने पीएमपीच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवितात, परंतु पीएमपीएलच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदविण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले आहे.
पीएमपी कार्यालयाकडून प्रवाशांच्या वाहक, चालक किंवा इतर तत्सम गोष्टींसंदर्भात काही तक्रारी असतील तर त्यासाठी ‘हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. त्या हेल्पलाईनचा क्रमांक प्रत्येक पीएमपीच्या बसमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाला जवळपास १६ ते १८ तक्रारी हेल्पलाईनवर येतात. त्यामध्ये पीएमपी वेळेत आली नाही किंवा बसमध्ये आम्हाला चढू दिले नाही? बीआरटीच्या मार्गामध्ये बस घुसवली, वाहकाचे उद्धट वर्तन, यासंदर्भात अनेक तक्रारी मांडल्या जातात. एखादी दुसरीच तक्रार तरुणीची असते की वाहकाने आरक्षित जागा उपलब्ध करून दिली नाही.
काही मुली पीएमपीच्या कार्यालयात येऊन लेखी तक्रार देतात. परंतु, हे प्रमाण खूप कमी आहे. हेल्पलाईनवर आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविण्यावर भर दिला जातो. जर महिलांच्या राखीव जागेवर एखादा पुरुष बसला असेल आणि तो उठण्यास नकार देत असेल तर त्या संबंधित महिला किंवा वाहकाला पीएमपी पोलीस स्टेशनला नेण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०१२ मध्ये हे परिपत्रकही काढले आहे. मात्र, त्याची अद्यापही म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा नव्याने पत्रिपत्रक काढले जाणार आहे. तरीही महिला, तरुणी यांना पीएमपीमध्ये असा अनुभव आल्यास त्यांनी तत्काळ ०२०-२४५४५४५४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने यांनी केले आहे.

Web Title: why the man sit in the reserved seats on the bus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.