जागतिक महिला दिन विशेष : नाट्यलेखन दिग्दर्शनाचा महिलांचा झोका उंच का नाही? अतुल पेठे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 08:00 AM2020-03-08T08:00:00+5:302020-03-08T08:00:09+5:30
अगदी मोजक्याच महिला नाट्यलेखन व दिग्दर्शनात दिसतात
राजू इनामदार -
पुणे : गेली अनेक वर्षे मी नाट्यक्षेत्रात लहानमोठ्या स्वरूपाची कामे करीत आहे. या इतक्या वर्षांत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे अगदी मोजक्याच महिला नाट्यलेखन व दिग्दर्शनात दिसतात. हे असे का होत असावे, याचा विचार व्हायला हवा. यामागच्या कारणाचा मी स्वत: विचार करतो, त्या वेळी मला काही गोष्टी प्रमुखपणे लक्षात येतात.
खरे तर महिला चांगले लेखन करू शकतात, त्यांचे भावविश्व नाटकाची कथावस्तू तयार करायला पोषक असेच असते; मात्र त्यांच्याकडून लेखन होऊ शकत नाही. समस्त पुरुषांना आजही महिलांना काय कळते असेच वाटते, हे यामागचे कारण आहे. लिहिण्यासाठी म्हणून महिलांना आत्मविश्वास देण्यात पुरुष कमी पडतात. हे विधान एखादे उदाहरण समोर आहे म्हणून केलेले नाही, तर सार्वत्रिक म्हणून केले आहे. महिला काय लिहिणार किंवा त्यांनी लिहिलेल्या नाटकात काय काम करायचे, असा विचार पुरुष अभिनेत्यांच्या मनात येतच नसेल, असे नाही. त्यांना तसे वाटते, असे महिला लेखकांना पक्के माहिती असल्यासारखेच वातावरण भोवताली असते. त्यातून महिला लिहीत नसाव्यात किंवा लिहायला प्रवृत्त होत नसाव्यात.
दिग्दर्शनाचेही तसेच आहे. वास्तविक, महिलांचे निरीक्षण चांगले असते. एखादा विषय त्या जास्त प्रभावीपणे उलगडून दाखवू शकतात; पण ते होत नाही. विजया मेहता वगळल्या तर आपल्याकडे महिला नाट्य दिग्दर्शकांची संख्या बोटांवर मोजावी इतकीही नाही. एखाद्या महिलेने सांगावे व आपण तसे करावे, हेच अनेकांना त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मानसिकतेमुळे पटत नसावे कदाचित. त्यामुळेही मोठ्या संख्येने कोणी पुढे येत नसावे. ही मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. त्यांना काय समजते, त्या काय सांगणार, त्यांना कळणार तरी आहे का? याप्रकारचे पुरुषी विचारच महिलांचे पुढे येणे रोखून धरतात. हे काही ठरवून वगैरे होत नाही, तर अनेक वर्षांच्या मानसिकतेतून ते नकळतपणे होत असते. यात बदल होणे गरजेचे आहे.
नाट्यलेखन-दिग्दर्शनात महिलांचे अंगण अगदीच सुने आहे, असे नाही. मुंबईत ज्योती डोगरा म्हणून एक लेखक-दिग्दर्शिका आहेत. त्यांनी ‘नोटंस आॅन चाय, ब्लॅक होल’ अशी काही नाटके लिहिली, स्वत:च दिग्दर्शित केली. मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक अशी काही आणखी नावे आहेत. सई परांजपे यांचेही नाव घेता येईल; पण त्या जास्तकरून चित्रपटाशी संबधित आहेत. अशी काही नावे आहेत; पण ती अपवाद म्हणून व त्यांच्या कर्तृत्वामुळेच स्मरणात राहिलेली आहेत.
या वाटेवर गर्दी का नाही, असे माझे म्हणणे आहे. सक्षमपणे लिहिणाºया महिला मोठ्या संख्येने पुढे यायला हव्यात. त्यासाठी त्यांनी पुरुषांना तसा अवकाश मोकळा करून द्यायला हवा. प्रोस्ताहन, उत्तेजन, कौतुक झाले तर अनेक महिला लिहित्या होतील, असा मला विश्वास आहे. तसे झाले तर आतापर्यंत लपलेले, कधीही बाहेर न आलेले असे अनेक सामाजिक, कोटुंबिक, विषय पुढे येतील, याची मला खात्री आहे.०००