मुंबईला एक अन् पुण्याला वेगळा न्याय का? पुण्यातील महापौरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:20 AM2021-08-03T11:20:13+5:302021-08-03T11:27:37+5:30
पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय
पुणे : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये मात्र तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामध्ये पुणे आणि मुंबईचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुण्यात काहीच शिथिलता देण्यात आली नाही. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
''पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. असा सवाल मोहोळ यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे.''
''या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे.असेही ते म्हणाले आहेत.''
राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये याआधीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन ठिकाणी सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये मोकळीक द्यायची की नाही याचा निर्णय संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतला जाईल, असं सरकारनं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे
एकूण १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
नेमकं काय सुरू राहणार?
- अत्यावश्यक आणि इतर सर्व दुकानं, शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रविवारी अत्यावश्यक दुकानं वगळता इतर सर्व आस्थापनं बंद राहणार आहेत.
- व्यायाम, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी सार्वजनिक बाग आणि खेळाची मैदानं सुरू होणार आहेत.
- शासकीय आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं पण कोरोना संबंधिचे सर्व नियम पाळून कर्मचाऱ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिफ्टचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
- जीम, योगा सेंटर, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा एसी सुरू न ठेवता एकूण ५० टक्क्यांच्या क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहे.
- रेस्टॉरंट्स एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनं दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
- चित्रपटगृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील
- सर्व धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.