पुणे महापालिकेच्या ११ गावांमधील ड्रेनेजच्या ३९२ कोटींचे काम विशिष्ट ठेकेदारालाच का? आमदार सुनील टिंगरे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:51 PM2021-06-10T20:51:17+5:302021-06-10T20:51:22+5:30
निविदा रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे केली मागणी
पुणे: महापालिकेतील ११ गावांमधील ड्रेनेज व मलनित्सारण प्रकल्पांच्या ३९२ कोटींचे काम विशिष्ट ठेकेदाराच पात्र ठरतील अशा पध्दतीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून झोननुसार किंवा चार ते सहा वेगवेगळ्या पॅकेजमध्ये काढण्यात यावी अशी मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
समाविष्ट ११ गावांमधील ड्रेनेज व मलनित्सारणाच्या कामांची ३९२ कोटींची निविदा प्रशासनाने काढली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या निविदाने प्रक्रियेने संशय निर्माण करणारे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुळातच ११ गावे ही शहरांच्या वेगवेगळ्या भागातील आहे. त्यानुसार या कामांसाठी झोननुसार किंवा चार ते सहा स्वतंत्र निविदा काढणे शक्य होते. त्यामुळे निविदांसाठी अधिकाधिक ठेकेदारपात्र होऊन निकोप स्पर्धा होऊ शकेल. तसेच ही कामे गुणव्वतापुर्ण व वेळेत पुर्ण होतील.
मात्र, असे असताना एकच निविदा ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर काढली असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराविषयी अनेक तक्रारी आहेत. त्यावर कारवाईचा प्रस्तावही प्रशासनाने ठेवला होता. त्यात या कामांची निविदा ८ ते १० टक्के इतक्या वाढीव दराने येणार असल्याची चर्चा निविदा उघडण्याआधीच सुरू आहे. निविदांमध्ये रिंग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी. आणि झोननुसार अथवा चार अथवा सहा वेगवेगळ्या निविदा काढण्यात याव्यात अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली आहे.