मोफत लस मिळते तर पैसे का मोजायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:35+5:302021-07-11T04:09:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोना प्रतिबंधक पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी लसीकरण सुरू असून नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये पैसे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोना प्रतिबंधक पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी लसीकरण सुरू असून नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये पैसे भरून लस घेण्यापेक्षा शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत लस घेण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. एरवी विविध आजारांच्या उपचारांसाठी शासकीय रुग्णालयाची पायरीदेखील न चढणारे नागरिक लशीसाठी मात्र सरकारी रुग्णालयांनाच पसंती देत आहेत. मोफत मिळत आहे तर पैसे का मोजायचे? अशी नागरिकांची सध्याची मानसिकता आहे.
पुणे जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. प्रारंभीच्या काळात हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मध्यंतरी त्यात खंडही पडला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्याने टप्प्याटप्प्याने लशींच्या उपलब्धतेनुसार ४५ ते ५९ वर्षांपुढील व्यक्ती आणि त्यानंतर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लशींसाठीचे नियोजन करण्यात आले. लसीकरण जलदगतीने होण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी लशीचे दर निश्चित करण्यात आले.
आजमितीला शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांसाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी लसीकरण केले सुरू आहे. गेल्या सहा महिन्यात पुणे जिल्ह्यात ५१ लाख ४४ हजार २७७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. खासगी रुग्णालयांपेक्षाही शासकीय रुग्णालयांमध्ये लस घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. शनिवारी (दि.१०) एका दिवसात पुणे ग्रामीण भागात ९९६०, महापालिका क्षेत्रात १५ हजार ३९८, पिंपरी चिंचवड भागात ९२९५ तर पुणे जिल्ह्यात ३४ हजार ६९३ इतके लसीकरण पार पडले.
चौकट
लसीकरणाची केंद्रे ६७९
शासकीय रुग्णालय : ५०२
खासगी रुग्णालय : १७७
आतापर्यंत पुणे जिल्ह्यात झालेले लसीकरण : ५१,४४,२७७
पहिला डोस -४०,२८,६५३
दुसरा डोस -११,१५,६२४
चौकट
शनिवारच्या (दि.१०) लसीकरणाची शहराची आकडेवारी
कोवॅक्सिन - १८२०
कोविशील्ड -१३५०५
स्फुटनिक - ७३
एकूण : १५३९८
------------------------------------------------------------------------------
“मी खासगीपेक्षा शासकीय रुग्णालयातच जाऊन लशीचा पहिला डोस घेतला. आजवर कधीच शासकीय रुग्णालयाची पायरी चढले नव्हते. पण तिथे गेल्यावर विशेष काही जाणवलं नाही. थोडावेळ लागला पण त्यासाठी मानसिक तयारी केली होती. खूप चांगला अनुभव मिळाला. आता दुसरा डोसदेखील तिथेच घेणार आहे.”- शर्वरी केळकर, तरुणी
-----------------------