...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:55 PM2019-04-18T20:55:28+5:302019-04-18T20:57:02+5:30
मोदींच्या गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यात कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत असं मोदी म्हणाले मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता. मोदींच्या गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.
दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.
दरम्यान ५ वर्षांपूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदींनी अनेक स्वप्न दाखवली, पण आज ५ वर्षानंतर निवडणुकांच्या तोंडावर मोदी त्या स्वप्नांनवर बोलायला तयार नाहीत. त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायाचा नाही. त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मतं मागायची आहेत अशी टीका राज यांनी केली.
मी महाराष्टातच राहणार, देशात जाणार नाही
मी महाराष्ट्रात भाषण करतोय आणि माझ्या भाषणाच्या क्लीप देशभरात व्हायरल होतायेत. देशाला मराठी भाषा समजतेय. हेच चांगले झाले. अनेक जण सांगतात मी देशात भाषणं करावं. हिदींतून भाषण करावं अशी मागणी होतेय. मात्र मी महाराष्ट्रातच राहणार, देशात जाणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
शहरं छान राहावीत यासाठी लोकप्रतिनीधी असतात
पूर्वी पुणे, मुंबई ही शहरं खूपच सुंदर होती, पण प्रगतीच्या नावाखाली ती विस्कटत जातात. हे जगभरात होतं फक्त ती शहरं प्रगती करून देखील टुमदार होतात. आपली शहरं मात्र बकाल होत जातात. आपली शहरं नुसती वाढत जात आहेत, त्याला आकार नाही उरला. वाढत्या शहरांमध्ये पुरेसं पार्किंग नाही, कॉलेजेस नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत. ही शहरं छान राहावीत म्हणून धोरण आखायचं असतं आणि हे धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी असतात त्यांना निवडणून देण्यासाठी ही निवडणूक आहे असल्याचं राज यांनी सांगितले.
सोनेरी मनसे आमदार रमेश वांजळेंची आठवण
खडकवासला भागातून येताना जाताना माझ्या रमेश वांजळेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते असं सांगत राज ठाकरे भावूक झाले.