रात्रीच्या बांधकामाचा त्रास का सहन करायचा? नागरिकांना होतोय त्रास, बांधकामे थांबवण्याची मागणी
By राजू इनामदार | Published: November 8, 2023 02:05 PM2023-11-08T14:05:02+5:302023-11-08T14:06:10+5:30
स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत असून महापालिका आयुक्तांनी याची त्वरीत दखल घ्यावी असे युवक काँग्रेसने म्हटले आहे....
पुणे : शहराच्या अनेक भागात रात्रीच्या वेळेस बांधकाम सुरू ठेवले जाते. विशेषत: पेठांमध्ये जिथे दिवसा बांधकाम साहित्याच्या गाड्या नेणे अवघड असते तिथे अशी कामे रात्रीच्या वेळी केली जातात. रात्री सुरू असलेली अशी बांधकामे त्वरीत थांबवावीत अशी मागणी युवक काँग्रेसने केली. स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत असून महापालिका आयुक्तांनी याची त्वरीत दखल घ्यावी असे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी सांगितले की वाळू, क्रशर डम्परमधून खाली करताना होणारा आवाज, बांधकाम सुरु असताना कामगारांचा आवाज, मिक्सरचा आवाज यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा काम करता येत नाही, त्यामुळे रात्री केले जाते. स्लॅब टाकायची असेल त्यावेळी संपूर्ण स्लॅबवर एकाच वेळी काँक्रिट ओतावे लागते. त्यामुळे बराच वेळ मिक्सर सुरू असतो. त्याचाही आवाज स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो.
रात्री अशा प्रकारे काम सुरू करणेच मुळात अयोग्य आहे. रात्री काम करायचे असेल तर त्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. कारण रात्री काम करण्यासच मनाई आहे. मात्र याची माहितीच नसल्याने त्याचाच गैरफायदा बांधकाम व्यावसायिक घेतात. पोलिसांकडे तक्रार करायला गेलो तर त्याची दखलच घेतली जात नाही. महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारवाई करायचीच नसते, त्यामुळे आता वरिष्ठ स्तरावरच यासंदर्भात त्वरीत कारवाई व्हावी अशी मागणी सुरवसे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.