अभ्यासक्रम लगेच कमी करण्याची घाई कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:15 AM2020-06-11T08:15:01+5:302020-06-11T08:15:24+5:30
शिक्षण तज्ज्ञांचे मत : सुट्ट्या रद्द करून अभ्यासक्रम पूर्ण करावा
पुणे : अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्याबाबत घाई होत असून शासनाने प्रत्येक राज्यातील काही शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णयावर यावे. तसेच शैक्षणिक वर्षासाठी किती दिवसांचा कालावधी मिळतो, याचा विचार करूनच अभ्यासक्रम कमी करावा. दिवाळीच्या व उन्हाळ्यातील सुट्ट्या रद्द करून आवश्यक दिवस उपलब्ध होत असतील तर अभ्यासक्रम कमी करण्याची आवश्यकता नाही, असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी अभ्यासक्रम कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. परंतु,अभ्यासक्रम कमी करण्याबाबत आत्ताच विचार करण्याची आवश्यकता नाही. शैक्षणिक वर्षासाठी किती दिवस उपलब्ध होतात यावर सर्व काही अवलंबून आहे. पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम याबाबत नेहमीच गल्लत केली जाते. कोणत्या इयत्तेमधील विद्यार्थ्याला कोणते घटक येणे आवश्यक आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या क्षमता त्या-त्या इयत्तेमध्ये विकसित व्हायला हव्यात. केवळ सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएससीई) च्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असणार आहे की राज्य शासनही याबाबत निर्णय घेणार आहे. हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
परीक्षा घेतली नाही तरी चालेल पण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सप्टेंबर- आॅक्टोबरपर्यंत शाळा सुरू झाल्या तरी दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. केंद्र शासनाने प्रत्येक राज्यातील काही शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. अभ्यासक्रम कमी करण्याची घाई करू नये.
- डॉ. अ. ल. देशमुख,
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ
शैक्षणिक काम करण्यासाठी किती दिवस उपलब्ध आहेत, त्यावर अभ्यासक्रम कमी करावा किंवा नाही हे ठरवावे. श्रावण, वाचन, लेखन आणि संभाषण क्षमता अधिक विकसित व्हायला हव्यात. पाठ्यक्रमातील कमी महत्त्वाचे घटक वगळले तरी काही हरकत नाही.
- एन. के.जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य
अभ्यासक्रमातील कमी महत्त्वाचे घटक वगळले तरी फारसा फरक पडत नाही. परंतु, कोणत्या इयत्तेमधील विद्यार्थ्याला काय आले पाहिजे. याबाबत निश्चित झालेल्या क्षमता तशाच ठेवाव्या लागतील.
- हेमांगी जोशी, निमंत्रक, महाराष्ट्र शिक्षण हक्क मंच