पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 06:41 PM2021-02-18T18:41:53+5:302021-02-18T19:10:57+5:30
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे...
पुणे : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जाते आहे. मात्र याप्रकरणी महाविकास आघाडीतील नेते मात्र सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. पण आता शिवसेनेच्या नेत्यानेच पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे.
महंमदवाडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीने रविवारी( दि. ७) घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. ही घटना आत्महत्या आहे की हत्या अशी शंका घेतली जात आहे. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे काही कॉल रेकॅार्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॅाप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ते गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले,पूजा चव्हाण प्रकरणी राठोड समोर का येत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण याबाबत तपास सुरु आहे. अहवाल सादर केलेला आहे अशीही माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे मी आणखी काही बोलणं योग्य नाही. असे म्हणत पूजा चव्हाण प्रकरणावर जास्त भाष्य करणे टाळले आहे.
विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे...
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपने आम्ही सर्वाधिक जागा जिंकू असा दावा केला होता. तसेच राज्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचेच सर्वाधिक सरपंच व उपसरपंच बसलेले पाहायला मिळतील असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात महाविकास आघाडीचेच ग्रामपंचायत व सरपंच निवडीवर वर्चस्व राहिल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप व त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत देखील सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.