मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
By श्रीकिशन काळे | Published: April 27, 2024 07:53 PM2024-04-27T19:53:36+5:302024-04-27T20:33:08+5:30
Mahesh Manjrekar in Pune: जर एखादा क्रीडामंत्री खेळाडूला बनवले किंवा एका चांगल्या शिक्षकाला शिक्षणमंत्री केले तर काय बिघडते ?
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘सध्या राजकारणाची स्थिती अत्यंत वाईट झालीय. तुम्हाला देश चालवायचा असतो. पण तुमची तेवढी पात्रता आहे का ? राजकीय लोकं मंत्री होतात. त्यांची पात्रता किमान बारावी पास तरी असायला हवी. जर एखादा क्रीडामंत्री खेळाडूला बनवले किंवा एका चांगल्या शिक्षकाला शिक्षणमंत्री केले तर काय बिघडते ? उलट ते चांगल्याप्रकारे काम करतील,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर शनिवारी (दि.२७) मांजरेकर बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.
राजकारणात प्रत्येकाने रूची घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रश्न विचारत नाही. मला खूप वाटतं की, अनेकांनी यात यायला हवे. जयललिता, एनटी रामाराव पासून अनेकांनी दोन्हीकडे चांगले काम केले. राजकीय लोकांना आता वाटते की, अभिनेत्यांनी राजकारणात यावे.
राजकारणी हे डिग्री घेऊन येत नाहीत. मला असं वाटतं की, जे संवेदनशील आहेत, त्यांनी राजकारणात यावे. एखाद्या कार्यालयात शिपायाची जागा आहे, त्यालाही बारावीची पात्रता लागते. जो देश चालवतो, तिथे निदान बारावी पास तरी हवा. तुम्ही देश चालवणार आहात. शिपायाकडून अपेक्षश करता की त्याने बारावी पास असावा. एवढा मोठा देश आहे .नाही तर तुम्ही नियुक्त्या करता. एखादा डॉक्टरला आरोग्य मंत्री करा ना, एकादा टिचर शिक्षणमंत्री करा ना. आज ज्याने बॅट उचलली नाही तो क्रीडामंत्री असतो. हे एक मॉडेल म्हणून करायला काहीच हरकत नाही.
आज आयडॉलॉजी राहिलेली नाही. मला कोणाला मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न आहे. कोणी कुठेही आहे. सर्व कन्फ्युजन आहे, असे मांजरेकर म्हणाले.