श्रीपाल सबनीसांचे तोंड दहा वर्षे बंद का?: रामदास फुटाणे यांची खरमरीत शब्दांत टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:18 PM2017-12-08T13:18:25+5:302017-12-08T13:26:54+5:30
दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला.
पुणे : दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? एवढे दिवस सबनीसांचे तोंड का बंद राहिले? भविष्यात आपली महत्त्वाची पदे जाऊ नये, बदनामी होऊ नये यासाठी किंवा संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा खरमरीत शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला.
आडकर फाउंडेशनतर्फे १९व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. आनंद यादवांच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला, त्या वेळी महाराष्ट्राने बंधुता किंवा क्षमाशीलता दाखविली नाही, अशी टीका एका कार्यक्रमात श्रीपाल सबनीसांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर फुटाणे यांनी टिप्पणी केली. या प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, आडकर फाउंडेशनचे अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
फुटाणे म्हणाले, ‘‘साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्यावरही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी साहित्यिकांना गावोगावी मतपत्रिका गोळा करण्यासाठी फिरावे लागत आहे. भविष्यात साहित्यातील कारकिर्दीपेक्षा ज्या उमेदवाराकडे मतपत्रिका गोळा करण्याची क्षमता आहे, तोच व्यक्ती अध्यक्षपदी निवडून येऊ शकतो.’’
सदानंद मोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य आणि समता यांचा समन्वय साधण्याचे काम बंधुता करते. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समरसता निरर्थक ठरू शकतात. अमेरिकेने मध्यंतरी मुस्लिमबहुल राष्ट्रांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे तिथे स्वातंत्र्य समरसतेचे राष्ट्र होऊ शकते, पण बंधुताप्रिय नाही.’’
उद्धव कानडे म्हणाले, ‘‘विविध जाती धर्माचे कळप तयार करुन संमेलनांचे आयोजन करण्यात येते. मात्र जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन होणाऱ्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. माझ्या जडणघडणीत फुटाणे, मोरे या दिग्गज लोकांचा खूप मोठा वाटा आहे.’’