Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल
By प्रशांत बिडवे | Published: June 21, 2024 11:44 AM2024-06-21T11:44:45+5:302024-06-21T11:46:07+5:30
राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.....
पुणे : महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाने एक महिन्यात लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पार पडाव्यात, यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पदवी तसेच पदविका परीक्षेत दाेन पेपर्समध्ये एक दिवसाची सुटी न देता ते सलग आयाेजित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयाला विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून विराेध हाेत आहे. राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी जास्त असल्याने विद्यार्थी अभ्यास तसेच प्रात्यक्षिक परीक्षांच्या तणावाखाली असतात. नुकतेच महाराष्ट्र राज्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षेच्या आयाेजनाबाबत दि. ४ जून राेजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये विद्यापीठातर्फे आगामी हिवाळी- २०२४ सत्रात आयाेजित केल्या जाणाऱ्या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा दरम्यान दाेन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी न देता सलग (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून) घेण्यात यावी, असा ठराव परीक्षा मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसारच आगामी हिवाळी २०२४ परीक्षेचे आयाेजन केले जावे, असे अधिष्ठाता, प्राचार्य यांना कळविले आहे. मात्र, या निर्णयाला विराेध हाेऊ लागला आहे.
‘द नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) नवी दिल्ली यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार दि. १२ फेब्रुवारी २०२४ राेजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा घेताना सलग पेपर घ्यावेत, असे बदल केल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, याच कालावधीत देशातील तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आराेग्य विज्ञान विद्यापीठांनी दाेन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी देत परीक्षेचे आयाेजन केले हाेते.
तेलंगणात हाेणार दिवसाआड परीक्षा
तेलंगणातील कालाेजी नारायणराव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस वारंगल, तेलंगणाच्या परीक्षा विभागाने दि. १४ जून राेजी एमबीबीएस लेखी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार दि. १ ऑगस्टपासून परीक्षेला प्रारंभ हाेणार असून, १ ते १२ ऑगस्ट या कालावधीत एक दिवसाआड सहा पेपरचे आयाेजन केले आहे.
अन्य राज्यातही एक दिवसाआड पेपरचा पॅटर्न
१. राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, जयपूर, राजस्थानने व्दितीय एमबीबीएस सप्लिमेंटरी परीक्षेचे दि. २५ मे ते ५ जून आणि २५ मे ते ७ जून या कालावधीत एक दिवसाआड परीक्षा घेतली.
२. मध्य प्रदेश आयुर्विज्ञान विश्वविद्यालय, जबलपूर, मध्य प्रदेश एमबीबीएस सप्लिमेंटरी परीक्षेचे दि. ४ ते २० मे या कालावधीत एक दिवसाआड पेपर घेतले.
३. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बंगळुरू, कर्नाटका विद्यापीठाने एमबीबीएस लेखी परीक्षेचे २६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत एक दिवसाआड आयाेजन केले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या वाढणार ?
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या तसेच हजाराे विद्यार्थी मानसिक आजारांनी ग्रासले असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर एनएमसीने नुकतीच १५ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांसमाेर आव्हाने असताना सलग पेपरचा निर्णय विद्यार्थ्यांच्या समस्यांमध्ये वाढ करणारा ठरणार आहे.
परीक्षेच्या आयाेजनाबाबत विद्यापीठाचा परीक्षा विभाग आणि परीक्षा मंडळाला स्वातंत्र्य आहे. एका दिवसात उजळणी शक्य नाही. माझे एमबीबीएस झाले, तेव्हा सलग पेपर हाेते. मात्र, सध्या विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारा बाैद्धिक, मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने मागणी केली जात असेल, तर विद्यापीठाने तसा निर्णय घेण्यास काही हरकत नाही.
- डाॅ. अविनाश भाेंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असाेसिएशन
महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणामध्ये ऑगस्ट २०२४मध्ये एमबीबीएस सत्र परीक्षा एक दिवसाआड आयाेजित केले जाणार आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही परीक्षेच्या आयाेजनात दाेन पेपरमध्ये एक दिवसाचा खंड द्यावा.
- डाॅ. संजय दाभाडे, पालक
सुटी न देता सलग पेपर घेतल्यामुळे परीक्षा लवकर संपेल आणि विद्यापीठाला निकालही वेळेत जाहीर करता येईल. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा महिनाभरात पुनर्परीक्षा घेता येणार आहे. ‘एनएमसी’च्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने परीक्षा मंडळाच्या बैठकीत या निर्णयाचा पुन्हा आढावा घेण्यात येईल.
-डाॅ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठ