का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:16 PM2019-10-16T21:16:16+5:302019-10-16T21:22:01+5:30
संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़. त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.
विवेक भुसे
पुणे : संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़. त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.
पुणे महापालिकेने संभाजी पुलाला समांतर सायकलींसाठी दोन पुल बांधण्याचा निर्णय घेतला होता़. हा निर्णय १९८०च्या दरम्यान घेण्यात आला होता़ त्यानुसार काकासाहेब गाडगीळ पुल (झेड ब्रिज) आणि पुना हॉस्पिटलजवळील यशवंतराव चव्हाण पुल यांचे बांधकाम सुरु झाले़, पण हे बांधकाम विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळले़. त्या दरम्यान, सर्वाधिक सायकलीच्या शहरातून गायब होऊ लागल्या होत्या व दुचाकींची संख्या वेगाने वाढू लागली होती़. कालांतराने या दोन्ही पुलांचे बांधकाम पुर्ण झाले़. तरीही लोकांना सवय असल्याने लोक या दोन्ही पुलावरुन जाण्याऐवजी संभाजी पुलावरुनच जात होते़. कोथरुडचा विकास वेगाने होत असल्याने सर्व जण या पुलाचा वापर शहराच्या दुसरी बाजूला येण्यासाठी करत असत़. त्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती़. पुलावरील वाहनांची संख्या कमी व्हावी व या दोन्ही पुलांचा वापर व्हावा, या हेतूने १९९४ मध्ये संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली़ त्यात रात्री साडेनऊ ते सकाळी सात यावेळेत सुट देण्यात आली होती़.
वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा वाहतूक पोलीस गैरफायदा घेऊ लागले़. एखादा दुचाकीस्वार चुकून या पुलावर गेला तर त्याला पुलाच्या सुरुवातीला कोणी अडवत नसत़ पण दुसऱ्या टोकाला गेल्यावर तो पोलिसांच्या तावडीत सापडत असे़. त्यातून अनेकांवर दंडात्मक कारवाई होत असे़. त्याचबरोबर वाहनचालकांकडून चिरीमिरी घेण्याचे एक नवे साधन वाहतूक पोलिसांना मिळाले होते. त्याच्या असंख्य तक्रारी कायमच येत असत़ त्यातून अनेक तक्रारी या वरिष्ठांपर्यंत नेहमी जात होत्या़. ही बंदी उठविण्यात येणार असल्याने आता या तक्रारीही बंद होतील.