शनिवारवाड्यात वाय-फाय सुविधा
By admin | Published: March 3, 2016 01:43 AM2016-03-03T01:43:22+5:302016-03-03T01:43:22+5:30
सध्याच्या काळात अत्यावश्यक गरज बनलेली इंटरनेटची सुविधा आता शनिवारवाडा परिसरामध्ये मोफत उपलब्ध होणार असून
पुणे : सध्याच्या काळात अत्यावश्यक गरज बनलेली इंटरनेटची सुविधा आता शनिवारवाडा परिसरामध्ये मोफत उपलब्ध होणार असून, त्याकरिता राज्य शासनाने ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवार वाड्यामध्ये लॅपटॉप आणि स्मार्ट फोनमध्ये इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी तरुण-तरुणी व पर्यटकांची लगबग वाढणार आहे.
पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा शनिवारवाडा बाजीराव-मस्तानी चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. शनिवार वाड्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर शनिवार वाड्यात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळामार्फत याकरिता महापालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानुसार टेंडर प्रक्रिया राबवून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती योजनेचे समन्वयक व महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली.
शनिवारवाड्याची दैनंदिन देखभाल पुरातत्त्व विभागामार्फत केली जाते. वाय-फाय सुविधेबरोबरच शनिवारवाडाही आता हायटेक होणार आहे. शनिवाड्याच्या तिकीट काउंटरवर नोंदणी केल्यानंतर वाय-फाय सुविधेचा कोड नंबर पर्यटकांना दिला जाणार आहे. तो कोड नंबर लॅपटॉप, स्मार्ट फोनमध्ये टाकल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयातील तरुण-तरुणी, फिरते व्यावसायिक यांची गर्दी आता शनिवारवाड्यावर वाढणार आहे.