पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण निश्चित
By Admin | Published: July 14, 2016 12:40 AM2016-07-14T00:40:29+5:302016-07-14T00:40:29+5:30
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूने
नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूने अडीच मीटर डांबरीकरण व अडीच मीटर मुरुमीकरण करण्यात येऊन रस्ता रुंद करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार आहे़ नारायणगाव शहरातील रुंदीकरण पावसाळ्यानंतर व चार पदरी रस्ता रुंदीकरणाप्रसंगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुलंद छावा संघटनेला दिली़ त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण होणार, हे निश्चित झाले आहे़
नारायणगाव शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी, तसेच रस्त्याची झालेली दुरवस्था या संदर्भात बुलंद छावाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष पराग हांडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता़
प्राधिकरणाच्या वतीने आंदोलन करू नये, अशा आशयाचे पत्र
देऊन रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले व प्रस्तावित रुंदीकरणासंदर्भात त्यांनी पराग हांडे यांना माहिती दिली़
बुलंद छावा व नागरिकांच्या मागणीनुसार सध्या सुरू असलेल्या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी केल्याने त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक विभागाच्या वतीने लवकरच रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ या प्रस्तावासाठी नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायतींचा ठराव घेण्यात येणार आहे़ हा ठराव मिळाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या नारायणगाव महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल़ प्रस्तावित रुंदीकरणानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूने अडीच/अडीच मीटरचे डांबरीकरण करण्यात येणार आहे़ डांबरीकरणालगत दोन्ही बाजूने अडीच/अडीच मीटर मुरुमीकरण करण्यात येईल़ त्यानंतर डे्रनेज व फुटपाथ करण्यात येणार आहे़
(वार्ताहर)