इंद्रायणीतील दूषित पाण्याचा शेतीसाठी सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:11+5:302021-04-07T04:10:11+5:30
भानुदास पऱ्हाड आळंदी : पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील मैलामिश्रित तसेच औद्योगिक वसाहतींमधील हानिकारक रसायन घटक असलेले सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडून ...
भानुदास पऱ्हाड
आळंदी : पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील मैलामिश्रित तसेच औद्योगिक वसाहतींमधील हानिकारक रसायन घटक असलेले सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण केले जात आहे. याच प्रदूषित पाण्याचा वापर नदीकाठचे शेतकरी सर्रासपणे शेकडो एकर शेतसिंचनासाठी करत आहेत. या पाण्यापासून भाजीपाल्यासह इतर सर्वच पिकांचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घेतले जात आहे. दूषित पाण्यापासून उत्पादित झालेली विविध पिके बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र ही सर्व पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहेत.
तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मैलामिश्रित सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील हानिकारक रासायनिक घटक असलेले दूषित पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. एकीकडे आळंदीसह आसपासची नदीकाठची असंख्य गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. नदीकाठचे तसेच पाईपलाईनचे लिप्ट असलेले अनेक शेतकरी विद्युत मोटारीच्या साह्याने हे पाणी आपल्या शेतात नेऊन विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत.
ज्यावेळी हे पाणी शेतातील पिकांना दिले जाते. त्यावेळी पाण्यातील सर्व हानिकारक घटक पिकांच्या मुळाद्वारे शोषले जातात. या पाण्यातून उत्पादित झालेला भाजीपाला तसेच धान्यात हे घटक स्थिर होतात. विशेष म्हणजे अशा पद्धतीचा भाजीपाला अथवा धान्य आरोग्यास अपायकारक ठरते. याच पाण्यावर उत्पादित केलेला चारा जनावरांना खाऊ घातल्यास त्यांनाही त्रास होतोच. मात्र चाऱ्यापासून तयार झालेले दूधदेखील मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू लागले आहे.
मैलामिश्रित तसेच हानिकारक रासायनिक घटक असलेले पाणी नदीपात्रात वाहून येत असल्याने पाण्याचे मोठे प्रदूषण झाले आहे. मात्र आळंदीकरांना हेच पाणी पिण्यासाठी तसेच वापरासाठी वापरावे लागत आहे. तर अनेक गावांच्या नळ - पाणी पुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून आहेत. परिणामी नागरिकांमध्ये आजार जडू लागले आहेत. अनेक नागरिक आर्थिक झळ सोसून पाण्याचा जार विकत घेत आहेत.
इंद्रायणी नदीपात्रातील दूषित पाणी मोटारीच्या साह्याने शेतीसाठी वापरले जाते. मात्र हे आरोग्यासाठी अपायकारक ठरू पाहत आहे.