Pune Dahi Handi: पुण्याच्या दहीहंडीत लेझर लाईटचा सर्रास वापर; पोलीस कारवाई केवळ ४ मंडळांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 01:25 PM2024-08-29T13:25:17+5:302024-08-29T13:26:23+5:30
यंदा पुणेकरांना डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला
पुणे: शहरात चौकाचौकांत दहीहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांनी ‘लेझर शो’चे आयोजन केल्याचे दिसून आले. पोलिसांच्या बंदीचे आदेश धुडकावून लेझर लाईट लावले गेले. तरीही पोलिसांनी कारवाई मात्र केवळ ४ मंडळांवर केली आहे.
दरम्यान, डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. याबाबत पोलिसांच्या नियत्रंण कक्षाकडे वेगवेगळ्या भागांतून १२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तरी शहरातील पाच परिमंडळांपैकी केवळ परिमंडळ दोन आणि परिमंडळ ५ मधील ४ मंडळांवरच भारतीय न्याय संहितेच्या २२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
दहीहंडीत घातक लेझर लाईटवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले होतेे. मात्र, कित्येक मंडळांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. पुणे पोलिसांनी लेझर बीम लाईट वापरण्याबाबत पुढील ६० दिवस बंदी घातली आहे. मात्र, दहीहंडीदरम्यान पुण्याच्या मध्यभागासह उपनगरांत ठिकठिकाणी मंडळांकडून दहीहंडीत डीजेचा कर्णकर्कश आवाज तसेच लेझर लाईटचा वापर करण्यात आला. डोळ्यांना त्रास देणाऱ्या या लेझर लाईटमुळे गेल्यावर्षी पुणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर बंदीचे आदेश काढले होते. मात्र, मंडळांकडून पोलिसांचे आदेश धुडकावून सर्रासपणे लेझर लाईटचा वापर केल्याचे पाहायला मिळाले.