पतीला मारले अन् तिला न्यायालयाने झापले.. ..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:16 PM2019-02-23T12:16:42+5:302019-02-23T12:30:17+5:30
पीडीत पती एका खासगी कंपनीत काम करत असून पत्नी निवृत्त शिक्षिका आहे. त्यांना 16 वर्षांची मुलगी आहे...
पुणे : पावसाने झोडपलं आणि नव-यानं मारलं तर तक्रार कुणाकडे करायची.? अशी म्हण प्रचलित आहे. नव-याकडून बायकोला मारहाण, त्रास, अत्याचाराच्या घटना सातत्याने ऐकायला मिळतात. पण पुण्यात चक्क पत्नीनेच पतीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. चक्क पत्नीने पतीच्या डोक्यावर गरम कुकर मारण्याचा प्रयत्न केल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी पत्नीच्या विरुध्द हिंसाचार न करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.
पतीच्या अत्याचारापासून संरक्षण मिळावे म्हणून पत्नीने न्यायालयात धाव घेतल्याचे प्रकार सर्रास घडतात. त्यावर पत्नीच्या बाजूने निकाल लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने पत्नीला फटकारत पतीलाच संरक्षण दिले आहे. सविस्तर माहिती अशी की, पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगीसाठी दावा दाखल केला होता. मात्र, पतीच पत्नीची देखभाल करत होता. त्यामुळे न्यायालयाने पोटगीची रक्कम दैनंदिन खर्चात विलीन केली होती. तर तिने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात ती पुरावा दाखल करू शकली नव्हती. त्यामुळे पतीने अँड. विजयकुमार ठोंबरे, अँड. हितेश सोनार आणि अँड. नीलेश वाघमोडे यांच्यामार्फत तो दावा रद्द करण्याबाबत अर्ज केला होता. त्या अजार्चा राग आल्याने तिने पतीस मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरवात केली. पीडित पती एका खासगी कंपनीत काम करत असून पत्नी निवृत्त शिक्षिका आहे. त्यांना 16 वर्षांची मुलगी आहे. दीड वर्षांपूर्वी पत्नीने पोटगीकरिता दावा दाखल केला होता.
* महिलांद्वारे पतीचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग
पती आणि पत्नी त्यांच्यात वाद झाल्याने पत्नीने गरम कुकर पतीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान दाखवून पतीने बचावासाठी हात मध्ये घातला. कुकर गरम असल्याने त्याचा हातास गंभीर दुखापत झाली होती. अँड. ठोंबरे यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने पतीला मारहाण करणा-या पत्नीला तंबी दिली आहे. घरगुती हिंसाचाराचा हा प्रकार गंभीर आहे. महिलांद्वारे पतीचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग देखील केला जातो. त्याकरता कायद्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद अँड. ठोंबरे यांनी केला.