कुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त हाेऊन विभक्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 08:36 PM2018-12-10T20:36:01+5:302018-12-10T20:39:01+5:30
कुत्री व ढेकणांनी त्रस्त हाेऊन पतीपासून विभक्त झालेली पत्नी तीन वर्षांनंतर पुन्हा नांदायला अाली.
पुणे : पतीला कुत्र्यांची अतिआवड. त्यामुळे कुत्र्यांची पिल्ले रात्रंदिवस घरातच असायची. मात्र त्यांचे केस जेवणात व पाण्यात जात. तसेच त्यांनी घरात केलेली घाण काढवी लागत. त्यात घरात ढेकणांचा सुळसुळाट. वरून सासरच्या व्यक्तींनी प्रशस्त फ्लॅट घेवून द्यावा, फिरायला बुलेट द्यावी, अशी मागणी करीत संयश घेवून छळ झालेली पत्नी तडजोडी अंती अखेर पुन्हा नांदायला जाण्यास तयार झाली आहे.
कुत्र्यांच्या पिल्लांमुळे घरात होणारी घाण, रुममध्ये ढेकणांचा उच्छाद, वडील व चुलत्यांना अपशब्द वापरल्याने प्रतिउत्तर दिले म्हणून पतीने केलेली मारहाण. पत्नीवर सतत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे. खर्चायला पैस न देणे. रात्री उरलेले अन्न खायला देणे, अशा त्रासाला कंटाळून पत्नीने आॅक्टोंबर २०१७ मध्ये केलेला पोटगी मिळण्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा दावा अखेर तिने मागे घेतला आहे. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दोघांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर तब्बल तीन वर्ष स्वतंत्र राहिलेले हे जोडपे आता पुन्हा नांदायला लागले आहे.
सोनू व पुनम असे या पती-पत्नीचे नाव. (बदललेले) १५ मे २०१५ साली मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे लग्न झाले. तिच्या वडिलांनी लग्नासाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च केला होता. पुनम ही घरीच असायची तर सोनू हा तळेगाव येथे एका कॉलेजमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. लग्नानंतर काही महिन्यांत सासरच्या व्यक्तींनी पुनमला त्रास देण्यास सुरुवात केली. सोनू याने घरात कुत्र्यांची पिल्ले पाळली होती. रात्रंदिवस ती घरातच असायची. त्यामुळे घरात नेहमी अस्वच्छता व आजारपण असे. कुत्र्यांचे केस पाण्यात व जेवणात जात. तसेच त्यांनी घरात केलेली घाण पुनम यांना काढवी लागत. या सर्व बाबी पुनम यांना अजिबात आवडायच्या नाहीत. घरात असलेल्या ढेकणांनी देखील त्या त्रस्त झाल्या होत्या. तु काळी आहेस, असे हिनवत तुझे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय घेत सोनू पुनमचा मोबाइल चाळत. आपल्याला तुझ्या वडिलांनी ९०० चौरस फुटाचा फ्लॅट घेवून द्यावा आणि फिरायला बुलेट द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येत होते. त्या व्यतिरीक्त विविध कारणांवरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे त्या सासरी जावून राहत होत्या. समझोता करण्यासाठी दोघांच्या कुटुंबियांत ३ बैठका देखील झाल्या. मात्र त्यातून काहीच तोडगा न निघाल्याने पुनम यांनी अॅड. संतोष काशिद यांच्या मार्फेत खडकी न्यायालयात आॅक्टोंबर २०१७ मध्ये पोटगीचा दावा दाखल केला होता. दरमहा २५ हजार रुपये पोटगी आणि अर्जाचा खर्च व त्रासापोटी १५ लाख रुपये मिळावे, अशी मागणी दाव्यात करण्यात आली होती.
तिला सुखात नांदविण्याचे वचन
तब्बल तीन वर्ष स्वतंत्र राहिल्यानंतर शनिवारी (८ डिसेंबर) झालेल्या लोकअदालतीमध्ये हा दावा ठेवण्यात आला होता. त्यावेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. सोनू याला आयुष्याचे महत्त्व पटवून देत दोघांनी सुखाने नांदवे असे सांगण्यात आले. तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन त्याला पटले व कुत्र्यांना यापुढे घराच्या बाहेर ठेवून पुनमला चांगल्या प्रकारे वागविण्याचे त्याने वचन दिले. त्यामुळे त्यांचा संसार आता पुन्हा सुरू झाल्याची माहिती अॅड, काशीद यांनी दिली. सोनू यांच्यावतीने अॅड. सोमीनाथ सोनवणे आणि अॅड. सुनिल क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले.