Pune Crime: 'मस्तानी'साठी पत्नीचा छळ, पतीकडून प्लास्टिकच्या बॅटने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 01:31 PM2024-03-02T13:31:54+5:302024-03-02T13:32:10+5:30
याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात पतीसह सासूविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : विवाहात ठरल्याप्रमाणे पाहुण्यांना मस्तानी दिली नाही म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आला. पतीकडून प्लास्टिकच्या बॅटने मारहाणही करण्यात आली. सरकारी अधिकारी असलेल्या सासूनेही छळ केला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात पतीसह सासूविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बाणेर येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली. तिचा २०१४ रोजी विवाह झाला होता. विवाह ठरवताना सासरच्या व्यक्तींनी लग्नात पाहुण्यांना पुण्यातील प्रसिद्ध मस्तानी देण्याचा आग्रह केला होता. मात्र, विवाहितेच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मस्तानीचा बेत ठेवला नाही. याच कारणावरून विवाहानंतर तिचा छळ केला जात होता, तसेच तिची सासू सातत्याने मी बडी सरकारी अधिकारी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहेत, तू अतिसामान्य घरची आहेस, तुझी लायकी नसताना आमच्या घरी आली, असे टोमणे मारत होती.
यानंतर माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने तिचा छळ केला जात होता. तिला पतीने अनेकदा प्लास्टिकच्या बॅटने मारहाणही केली. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक सुजाता शामने करतात.