अनोळखी इसमाच्या खुनाची उकल :बायकोनेच प्रियकराच्या मदतीने रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:47 PM2019-06-22T16:47:22+5:302019-06-22T16:49:41+5:30
जखमी अस्वस्थेत रस्त्याच्या कडेला मृत झालेल्या व्यक्तीच्या खुनाची २४ तासांच्या आत उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.
पुणे : जखमी अस्वस्थेत रस्त्याच्या कडेला मृत झालेल्या व्यक्तीच्या खुनाची २४ तासांच्या आत उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. संबंधित व्यक्तीच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रकाश शंकरराव विलायतकार (रा. त्रिमूर्ती रिक्षा स्टँडजवळ, फुरसुंगी) यांना मारहाण करून रस्त्यावर टाकण्याची आल्याची खबर हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या बेल्टवरून ते काम करत असलेल्या सिक्युरिटी एजन्सीमधून त्यांची ओळख पटवण्यात आली. दुसरीकडे त्यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी विलायतकार यांच्या पत्नी, नातेवाईक, सहकारी आणि शेजारी यांच्याकडे विचारणा केल्यावर माहिती मिळाली. यातली काही माहिती जुळत नसल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. त्यावरून मयताची पत्नी सरिता प्रकाश विलायतकार (वय, ३४) आणि तारकेश तानाजी रणधीर (वय, २५) यांना अटक करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता आणि तारकेश यांचे प्रेमसंबंध तिचे पती प्रकाश यांना समजले. त्यामुळे ते चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होते. हा त्रास बंद होण्यासाठी आणि प्रेमसंबंधातला अडथळा दूर होण्यासाठी तारकेश आणि सरिता यांनी कट रचला. त्यानुसार तारकेश याने मित्रासह प्रकाश यांना मारहाण करून ओढ्याजवळील मातीच्या ढिगाऱ्यामागे टाकले.मात्र पोलिसांनी कौशल्याने आणि वेगाने तपास केल्याने आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, संजय चव्हाण, किरण लोंढे ,प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक माणिक डोके आणि इतर कर्मचाऱ्यांनी तपास केला.