कौटुंबिक वादातून पत्नीचे भिंतीवर डोकं आदळून खून; ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार, हडपसर मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:41 IST2024-10-07T13:39:47+5:302024-10-07T13:41:06+5:30
डोके भिंतीवर आपटून पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केल्याचे जागीच मृत्यू झाला

कौटुंबिक वादातून पत्नीचे भिंतीवर डोकं आदळून खून; ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार, हडपसर मधील घटना
पुणे : कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदे वस्ती परिसरात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.
आरती देबिलाल सरेन (३२, सध्या रा.शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती देबिलाल लक्ष्मणचंद्र सरेन (४०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय शंकर चौधरी (५५, रा.तुकाई दर्शन, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरेन दाम्पत्य मूळचे पश्चिम बंगालमधील आहे. ते हडपसर परिसरातील शिंदे वस्ती परिसरातील दत्तात्रय चौधरी यांच्या चाळीत राहायला आहे. आरोपी देबिलाल आणि त्याची पत्नी आरती मजुरी करतात. त्यांना सहा वर्षांच्या मुलगा आहे. सरेन दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद व्हायचे. शुक्रवारी (दि. ४) मध्यरात्री त्यांच्यात वाद झाला. भांडणाचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला.
देबिलालने पत्नी आरतीचे डोके भिंतीवर आपटले, तसेच तिच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, पहाटे सहा वर्षांचा मुलगा आर्यन याला घेऊन आरोपी देबिलाल घरातून पसार झाला. शनिवारी (दि. ५) सकाळी सरेन यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. आरती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, खोली मालक चौधरी यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक सुतार पुढील तपास करत आहेत.