दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा कुऱ्हाडीने खून
By admin | Published: May 30, 2015 10:58 PM2015-05-30T22:58:49+5:302015-05-30T22:58:49+5:30
दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याचा प्रकार कारखेल (ता. बारामती) परिसरात घडला.
सुपे : दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याचा प्रकार कारखेल (ता. बारामती) परिसरात घडला. कारखेल परिसरातील भापकरवस्ती येथे हा प्रकार शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडला.
सुमो जीप आणण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही, तसेच जमिनीची वाटणी माहेरच्या लोकांनी करून दिली नाही, त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिच्या पतीला चिथावणी दिली. त्यामुळे आरोपीने विवाहिता झोपेत असताना कुऱ्हाडीने, धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पोटावर वार करून ठार मारले, अशी तक्रार तिचे चुलते पांडुरंग दादा पवार (वय ६१, रा. निरवी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सोनाली महेंद्र भापकर (वय २२, रा. कारखेल) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती महेंद्र महादेव भापकर (वय २५), सासू पद्म भापकर, सासरा महादेव भापकर, मोठा दीर राजहंस भापकर आणि लहान दीर संतोष भापकर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीचा महेंद्र भापकर याच्याशी डिसेंबर २०१२ विवाह झाला होता. या दाम्पत्याला दीड वर्ष वयाचा शौर्य नावाचा मुलगा आहे. आरोपी महेंद्र तसेच त्याचे आई, वडील व दोघे भाऊ मिळून सोनालीचा नेहमीच मानसिक व शारीरिक छळ करीत असत. माहेरून पैसे आणावेत तसेच त्यांच्या वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मागावा या कारणाने तिचा नेहमीच छळ करीत होते.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, यवतचे अजय गोरड, गुन्हे शोध पथक, तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी या घटनेची
माहिती घेतली. (वार्ताहर)
४शुक्रवारी रात्री सोनाली वडीलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा मागत नसल्याच्या कारणावरून महेंद्रच्या आई, वडील आणि दोघा भावांनी महेंद्रला चिथावणी दिली. महेंद्रने कुऱ्हाडीने सोनालीच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर वार केले. चाकू पोटात भोकसून तिचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. ३०) रात्री तीनच्या सुमारास घडली. त्यानंतर या पाच जणांनी घरात दरोडा पडल्याचा बनाव केला. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूस माहिती घेतली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी महेंद्रने खुनाची कबुली दिली. यासंदर्भातील खबर सोनालीचे चुलते पवार यांनी पोलीस ठाण्यात दिली.