पुण्यात पत्नीचा गळा दाबून केला खून; मृतदेह साडीत गुंडाळून दिला फेकून, पोलिसांनाही केला स्वतःच फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:31 PM2022-03-22T13:31:53+5:302022-03-22T13:32:08+5:30
विवाहानंतर पतीसह सासरकडील लोकांनी शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली
लोणी काळभोर : चारित्र्यावर संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साडीत गुंडाळुन कात्रज बायपास रोडच्या पलीकडे मोकळ्या प्लॉटमध्ये कंपाऊंडच्या आत टाकून दिला आहे. सदर घटना मंतरवाडी (ता हवेली) येथे घडली आहे. पतीस अटक करण्यात आली आहे.
विदया राहुल फडतरे हिचा खून केल्याप्रकरणी तिचा पती राहुल ज्ञानोबा फडतरे (वय ३२, मुळ रा. गणेशवाडी, बोपगांव, ता. पुरंदर. सध्या रा. मंतरवाडी, देवाची ऊरूळी, ता हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मयत विद्या हिचे वडील दत्तात्रय कृष्णा शेडगे (वय ५०, रा. परिंचे ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी विदया हिचा विवाह राहुलशी झाला. एक वर्षानंतर तिला पतीसह सासरकडील लोकांनी शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत. तीन वर्षापुर्वी त्यांना मुलगा झाला. सुमारे एक वर्षापुर्वी सासरकडील लोकांनी विदया हिस चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करून त्रास दिल्याबाबत तीने पती व सासरकडील लोकांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी सासवड पोलीसांनी गुन्हा नोंद करून कारवाई केलेली आहे. त्यानंतर सन २०२९ मध्ये पती व सासरकडील लोक हे तिचे माहेरी गेले व मुलीस नांदावयासं पाठवुन दया. आंम्ही त्रास देणार नाही असे म्हणाले त्यानंतर विद्या सासरी गेली.
सोमवार (२१ मार्च रोजी) रात्री १२-३० वाजण्याच्या सुमारास मंतरवाडी येथे राहुल याने विदयाचा गळा दाबुन खुन केला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मृतदेह साडीत गुंडाळून हडपसर पोलीस ठाण्याच्या हददीत कात्रज बायपास रोडचे पलीकडे मोकळ्या प्लॉटमध्ये कंपाऊंडच्या आत टाकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार खून केल्यानंतर आपल्यावर संशय येवू नये म्हणून राहूल याने सकाळी शहर पोलीस मुख्यालयाला फोन करून आपल्या पत्नीचा मृतदेह सदर ठिकाणी पडला असल्याची माहिती दिली. काही वेळाने हडपसर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. संशय आल्याने केलेल्या चौकशीत राहूल याने पत्नीचा खून आपण केला असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून लोणी काळभोर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.