ब्युटी पार्लरच्या कामासाठी पत्नी गेली होम सर्व्हिसला; पतीने संशय घेऊन केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 04:29 PM2022-11-13T16:29:04+5:302022-11-13T16:29:17+5:30
महिला पोळी भाजी केंद्रात काम करण्याबरोबरच ब्युटी पार्लरचे काम करते
पुणे : ब्युटी पार्लरच्या कामासाठी अनेकदा महिला संबंधित महिलेला घरी बोलावतात. त्यानुसार एक महिला होम सर्व्हिससाठी गेली होती. पतीने संशय घेऊन तिला लाटण्याने मारहाण करुन केस धरुन जमिनीवर आदळून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुतारदरा येथील एका ३५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील एका पोळी भाजी केंद्रात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पोळी भाजी केंद्रात काम करतात. तसेच त्या पार्लरचे काम करतात. पार्लरच्या कामासाठी होम सर्व्हिससाठी त्या एका ग्राहकाकडे गेल्या होत्या. या कारणावरुन त्यांच्या पतीने संशय घेतला. त्या पोळी भाजी केंद्रात असताना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोळी भाजी केंद्रातील किचनमधील लाटण्याने मारहाण करुन जखमी केले. डोक्याचे केस धरुन जमिनीवर आदळले. यात जखमी झाल्यामुळे आता त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करीत आहेत.