कुत्र्याची पिले व ढेकणांनी त्रस्त पत्नी पुन्हा आली सासरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:12 AM2018-12-11T04:12:39+5:302018-12-11T04:12:58+5:30
पोटगीसाठी केला होता अर्ज; पतीने केला होता फ्लॅट व बुलेटसाठी शारीरिक छळ
पुणे : पतीला कुत्र्यांची अती आवड. त्यामुळे कुत्र्याची पिले रात्रंदिवस घरातच असायची. मात्र, त्यांचे केस जेवणात व पाण्यात जात; तसेच त्यांनी घरात केलेली घाण काढावी लागे. यातच घरात ढेकणांचा सुळसुळाट. वरून सासरच्या व्यक्तींनी प्रशस्त फ्लॅट घेऊन द्यावा, फिरायला बुलेट द्यावी, अशी मागणी करीत संयश घेऊन छळ झालेली पत्नी तडजोडीअंती अखेर पुन्हा नांदायला जाण्यास तयार झाली आहे.
वडील व चुलत्यांना अपशब्द वापरल्याने प्रत्युत्तर दिले म्हणून पतीने केलेली मारहाण, पत्नीवर सतत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे, खर्चायला पैस न देणे, रात्री उरलेले अन्न खायला देणे, अशा त्रासाला कंटाळून पत्नीने आॅक्टोबर २०१७मध्ये केलेला पोटगी मिळण्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा दावा अखेर तिने मागे घेतला आहे. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दोघांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर तब्बल तीन वर्षे स्वतंत्र राहिलेले हे जोडपे आता पुन्हा नांदायला लागले आहे.
सोनू व पूनम असे या पती-पत्नीचे नाव. पूनम ही घरीच असायची, तर सोनू हा तळेगाव येथे एका कॉलेजमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. सोनू याने घरात कुत्र्याची पिले पाळली होती. रात्रंदिवस ती घरातच असायची. त्यामुळे घरात नेहमी अस्वच्छता व आजारपण असे. कुत्र्यांचे केस पाण्यात व जेवण्यात जात. तसेच त्यांनी घरात केलेली घाण पूनम यांना काढावी लागे. या बाबी पूनम यांना आवडायच्या नाहीत.
घरात असलेल्या ढेकणांनीदेखील त्या त्रस्त झाल्या होत्या. त्याव्यतिरिक्त विविध कारणांवरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे पूनम यांनी अॅड. संतोष काशिद यांच्यामार्फेत खडकी न्यायालयात २०१७मध्ये पोटगीचा दावा दाखल केला होता.
दरमहा २५ हजार रुपये पोटगी आणि अर्जाचा खर्च व त्रासापोटी १५ लाख रुपये मिळावेत, अशी
मागणी दाव्यात करण्यात आली होती.
सुखात नांदविण्याचे वचन...
तब्बल तीन वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर शनिवारी (दि. ८ डिसेंबर) झालेल्या लोकअदालतीमध्ये हा दावा ठेवण्यात आला होता, त्या वेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. सोनू याला आयुष्याचे महत्त्व पटवून देत दोघांनी सुखाने नांदावे, असे सांगण्यात आले. कुत्र्यांना यापुढे घराच्या बाहेर ठेवून पूनमला चांगल्या प्रकारे वागविण्याचे त्याने वचन दिले. सोनू यांच्या वतीने अॅड. सोमीनाथ सोनवणे आणि अॅड. सुनील क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले.