पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:08 AM2018-08-06T01:08:21+5:302018-08-06T01:08:32+5:30
घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे.
पुणे : घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिवासी भारतीय (एनआरआय) असलेल्या पतीने पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. जोशी यांनी दिला आहे.
२०१७मध्ये पत्नीने खडकी येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम १२ नुसार देखभाल खर्च आणि घरभाडे देण्याची मागणी केली होती. ती मान्य करीत न्यायालयाने पत्नी आणि मुलींचा देखभाल खर्च म्हणून महिना १५ हजार रुपये आणि दरमहिना घरभाडे म्हणून १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुझेन जॉनबरोबर दुबई येथे राहायला गेली. सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार चांगल्या प्रकारे सुरू होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. वाद मिटतच नसल्याने सुझेन काही दिवसांनी पुन्हा भारतात निघून आली. भारतात आल्यानंतर आपण गरोदर असल्याचे तिला समजले.
दुबई येथे राहात असताना जॉनकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे दाखल केलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून जॉनने केरळ न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या वेळी झालेल्या समुपदेशनात सुझेनने कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत खटला दाखल केल्याची माहिती जॉनला समजली. दरम्यान न्यायालयाने याप्रकरणी पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केरळ न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे. देखभाल खर्च आणि भाड्याबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका जॉन याच्या वतीने अॅड. सुदीप केंजळकर दाखल करणार आहेत.
>मैत्रीचे रुपांतर प्रेमात
जॉन आणि सुझेन (नावे बदलेली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. जॉन हा मूळचा केरळ येथील आहे. मात्र तो सध्या दुबई येथे वास्तव्यास आहे. तो तेथे धार्मिक शिक्षण घेत आहे.तर सुझेन ही खडकी येथे राहण्यास असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांची मेट्रोमनी वेबसाईटवरून ओळख झाली होती.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये पुण्यात लग्न केले होते. त्यांना १ वर्षाची मुलगीदेखील आहे.