पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 09:45 IST2025-04-19T09:44:11+5:302025-04-19T09:45:21+5:30
ज्या व्यक्तीसोबत पत्नीचे अनैतिक संबंध निर्माण झाले, त्याचाकडूनच घेतले होते व्याजाने पैसे

पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले
पुणे: त्याने ज्या सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले, त्या सावकारासोबतच त्याच्या पत्नीने अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून तरुण पतीने पंख्याला दोरी लटकवून गळफास घेतला. याप्रकरणी पत्नीसह सावकाराविरोधात गुन्हा दाखल करून काळेपडळ पोलिसांनी त्यांना अटक केली. आत्महत्येची घटना गुरुवारी (दि. १७) मध्यरात्रीच्या सुमारास हडपसरमधील सिद्धिविनायक विहारातील इ-बिल्डिंगमध्ये घडली आहे.
सचिन सतीश गिरी (३७, रा. सिद्धिविनायक विहार, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी कोमल सचिन गिरी (३०) आणि रवींद्र मारुती मेमाणे (४५, रा. सत्यनारायण कॉलनी, फुरसुंगी) याला अटक केली आहे. याप्रकरणी सचिन गिरी याची बहीण सविता संतोष भारती (३९, रा. उरळी देवाची) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघेही हडपसर परिसरातील हांडेवाडीजवळील इमारतीत राहत होते. त्यावेळी कोमलची आरोपी रवींद्र मेमाणे याच्याशी ओळख झाली होती. त्याचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दरम्यान, याबाबतची काहीही माहिती सचिनला नव्हती. आरोपी रवींद्र हा सचिनच्या घरी येत असल्यामुळे त्यांच्यातही मैत्री झाली. त्यानंतर सचिनने आरोपी रवींद्रकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. मात्र, काही महिन्यांनंतर आरोपीने रक्कम मागण्यास सुरुवात केली. पैशांचा वारंवार तगादा लावल्यामुळे सचिनला मनस्ताप झाला. बायकोचे अनैतिक संबंध आणि सावकाराच्या त्रासाला कंटाळून सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करत आहेत.