मावळातील दुर्गम भागात वन्य जीवांची शिकार
By admin | Published: December 27, 2016 03:18 AM2016-12-27T03:18:11+5:302016-12-27T03:18:11+5:30
मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात मोठी जंगले असून, येथे मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे. या अतिदुर्गम भागात काही वर्षांत वन्य
कामशेत : मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात मोठी जंगले असून, येथे मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे. या अतिदुर्गम भागात काही वर्षांत वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, याकडे वन विभागाचे लक्ष नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
मावळ निसर्गसृष्टीने व नैसर्गिक संसाधन सामग्रीने बहरला आहे. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक मावळात भेटी देत असतात. अतिदुर्गम भागात दाट वनराई, जंगले असल्याने येथे बऱ्याच वन्य प्राण्यांचा वावर असतो. या वन्य प्राण्यांचा दुर्गम गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला तसेच इतर जीवित हानीला त्रास होऊ नये म्हणून ठरावीक गावातील नागरिकांना बंदुकीचे परवाने दिले आहेत. या बंदुकीचा विधायक कामासाठी वापर न करता अनेक जण सर्रास शिकारीसाठी वापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक मुंबई, पुणे शहरातील प्रतिष्ठित बंदूकधारी नागरिकही शिकारीसाठी मावळला पसंती देत असतात. यामध्ये अनेकांचे लागेबांधे असल्याच्या तक्रारी येत असून, या सर्वांमध्ये वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले असल्याचे दिसत आहे.
नाणे, आंदर, पवन मावळातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भागांमध्ये मोठी वनराई जंगले, मोठी धरणे, तलाव, ओढे, गावतळी आहे. डोंगर पठारावरील जंगलातील पाणी कमी झाल्यास वन्य प्राणी पाणवठ्यावर येतात. या प्राण्यांकडून कोणाच्याही जीविताला आत्तापर्यंत धोका झाला नाही. स्वत:च्या हौसेसाठी व मित्रमंडळी व पाहुण्यांना मटण भेट देण्यासाठी, विक्रीसाठी या शिकारी होत आहे. मुंबई, पुण्याकडील बरीच प्रतिष्ठित मंडळी स्थानिकांना हाताशी धरून या शिकारी करीत आहेत. याशिवाय स्थानिक नागरिक आदिवासी लोकही वेळोवेळी शिकारीचा आनंद घेत
असल्याचे अनेक जण तक्रार करीत आहेत. या शिकारींमध्ये प्रामुख्याने रानडुक्कर, सायाळ, ससे, मोर
लांडोर आदी प्राण्यांच्या शिकारी केल्या जात आहेत.
रात्री शिकार केलेल्या प्राण्यांच्या मटणावर यथेच्छ ताव मारला जात आहे. हे मटण आजूबाजूच्या प्रमुख गावांमध्ये व शहरात मोठ्या किमतीला विक्री केले जात आहे. शिवाय, गावातील नागरिकांना व पाहुणे मंडळींना भेट म्हणून वाटण्यातही येत आहे. याशिवाय शहरातील मित्रमंडळींना आग्रहाची आमंत्रणे पाठवून दारू व वन्य प्राण्यांच्या मटणावर पार्ट्या झोडल्या
जात आहेत. अनेकांनी हा रोजगार बनवला आहे. (वार्ताहर)
फुकटच्या दारूसाठी वाढलाय त्रास
मावळातील वाढलेल्या शिकारींमध्ये गावातील स्थानिकांबरोबर अनेक मोठ्या शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असून, शिकारीतून मिळणाऱ्या मटणाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मुंबई, पुण्याच्या तसेच आजूबाजूच्या प्रमुख शहरातील नागरिकांचे मावळातील या दुर्गम भागात वावर वाढला आहे. गावातील अनेक तरुण थोड्याशा पैशांसाठी त्यांना साथ देऊन वन्यसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहेत. याचप्रमाणे शहरातील नागरिकांच्या दारूच्या आमिषाला बळी पडत आहेत. या वाढत्या शिकारींमुळे दुर्गम गावांमधील तरुणवर्ग दारूच्या आहारी जाऊ लागला असून, फुकटात मिळणाऱ्या दारूसाठी मुक्या प्राण्यांचे बळी घेऊ लागला आहे. अशा शिकारी बंदूकधाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी प्राणिमित्र संघटना व नागरिक करीत आहेत.
वनरक्षकांची कमतरता
कामशेत शहराच्या जवळील चिखलसे गावाशेजारील डोंगरावर काही वर्षांपूर्वी मोर व लांडोर यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. पण, वाढत्या शिकारी व प्राण्यांच्या तस्करीमुळे येथे मोर व लांडोर दिसणे दुर्मीळ झाले आहे, असे स्थानिक सांगतात. मावळात वन विभागाचे वन्य क्षेत्र मोठे आहे. पण, वनरक्षक व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या बेकायदा शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.