पुण्यातील वेताळ टेकडीवर आढळली ‘जंगली कॅट’ ; 'वाइल्ड लाइफ'साठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:54 AM2021-02-01T11:54:25+5:302021-02-01T11:54:35+5:30
काही दिवसांपुर्वी कुणाल यांना टेकडीवर जंगली कॅटचे एक पिल्लू सापडले होते.
पुणे : वेताळ टेकडीवर (एआरएआय) जंगली कॅट आढळून आली असून, काही दिवसांपुर्वी तिचे पिल्लू देखील याच परिसरात दिसून आले होते. त्यामुळे या टेकडीवरील वाइल्ड लाइफ चांगले असल्याचे हे चित्र आहे, अशी भावना प्राणिशास्त्राचे अभ्यासक कुणाल गोखले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
काही दिवसांपुर्वी कुणाल यांना टेकडीवर जंगली कॅटचे एक पिल्लू सापडले होते. त्या पिल्ला त्यांनी वन विभाग आणि रेस्क्यू टीमकडे सुपूर्द केले. तसेच परत तिच्या आईकडे जाण्यासाठी प्रयत्न केले. पण ज्या ठिकाणी ते पिल्लू सापडले तिथे दोन रात्री गस्त ठेवून देखील तिची आई आली नाही. त्यामुळे रेस्क्यू टीमच्या देखदेखी खाली ते पिल्लू सुरक्षित आहे. त्यानंतर टेकडीवर कुणाल यांना एक दिवसांपुर्वी जंगली कॅट दिसली. त्यामुळे ती त्या पिल्लाची आई असल्याचा अंदाज आहे. यावरून टेकडीवरील वाइल्ड लाइफ देखील उत्तम आहे, हे त्याचे उदाहरण असल्याचे कुणाल यांनी सांगितले.
जंगली कॅट शेतीच्या परिसरात आणि जंगलातही आढळते. सासवड माळरान, दिवे घाट, सिंहगड परिसरातही दिसून येते. पण वेताळ टेकडीवर दुर्मिळ आहे. या जंगली कॅटच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न करायला हवेत. साप, उंदीर, खारूताई, पक्षी, पक्ष्यांच्या घरट्यातील अंडी हे या कॅटचे खाद्य आहे.’’
===============
वेताळ टेकडीवर दररोज हजारो नागरिक फिरायला, पक्षी निरीक्षण करायला येतात. या नागरिकांच्य वर्दळीमध्ये ही जंगली कॅट टेकडीवर दिसून येत आहे. त्यामुळे तिने नागरिकांच्या वर्दळीसह जगणे स्वीकारले आहे. या कॅटबाबत नागरिाकंमध्ये जनजागृती करून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत.
- कुणाल गोखले, प्राणिशास्त्र अभ्यासक