वन्य छायाचित्रकाराला लुटणाऱ्यांचा फेटाळला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:33+5:302021-09-08T04:15:33+5:30
पुणे : बाणेर येथील टेकडीवर छायाचित्रणासाठी गेलेल्या वन्य छायाचित्रकाराला लुटणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. ...
पुणे : बाणेर येथील टेकडीवर छायाचित्रणासाठी गेलेल्या वन्य छायाचित्रकाराला लुटणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी हा आदेश दिला.
अक्षय विठ्ठल सूर्यवंशी (वय २३, रा. बाणेर), विशाल महादेव गायकवाड (वय १९, रा. औंध. मूळ रा. पाटोदा, जि. उस्मानाबाद) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. याबाबत ४० वर्षीय वन्य छायाचित्रकाराने फिर्याद दिली आहे.
१७ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी व त्याच्या साथीदाराने फिर्यादीकडील कॅमेरा, मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रोकड असा १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सूर्यवंशी व गायकवाड याने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून जामीन दिल्यास ते असा गुन्हा पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना जामीन दिल्यास ते फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद ॲॅड. मुरळीकर यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत दोघांचा जामीन अर्ज फेटाळला.