वन्यप्राण्यांचेही कुटुंबनियोजन ! राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:02 AM2018-06-16T04:02:35+5:302018-06-16T04:02:35+5:30

केंद्रीय प्राणी प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी झपाट्याने वाढणाऱ्या सांबर, काळवीट, चितळ, नीलगाय यांची नियमितपणे नसबंदी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Wildlife family planning! Rajiv Gandhi Zoo | वन्यप्राण्यांचेही कुटुंबनियोजन ! राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

वन्यप्राण्यांचेही कुटुंबनियोजन ! राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

Next

- सुषमा नेहरकर-शिंदे 
पुणे - केंद्रीय प्राणी प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी झपाट्याने वाढणाऱ्या सांबर, काळवीट, चितळ, नीलगाय यांची नियमितपणे नसबंदी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. वन्यप्राण्यांचे कटुंबनियोजन करण्यासाठी पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात ‘नसबंदी’चा प्रयोग यशस्वी झाला आहे.
महापालिकेने कात्रज येथील तब्बल १३० एकर जागेत नैसर्गिक आभासाचे, प्राणी प्रजोत्पादनासाठी व वन्यजीव संवर्धन शिक्षण, संशोधनासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय विकसित केले आहे. येथे सध्या एकूण ४०३ विविध प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये काळवीट, सांबर, चिंकार, नीलगाय, वाघ, पांढरा वाघ, सिंह, हत्ती, हीरण, माकड, अस्वल असे सुमारे ६६ प्रकारचे विविध जातींचे प्राणी येथे आहेत. प्रत्येक प्राण्यासाठी स्वंतत्र खंदक करून वेगवेगळ््या विभागात त्या-त्या जातीचे प्राणी एकत्र ठेवले आहेत. यात नर-मादी असे दोन्ही एकत्र राहत असल्याने काळवीट, सांबर, हरीण, माकड, नीलगाय, चितळ यासारख्या प्राण्यांचे प्रजनन होऊन झपाट्याने संख्या वाढते. बहुतेक वेळा एकाच कुटुंबसाखळीत हे प्रजनन होत असल्याने नव्याने जन्म घेणाºया वन्यजीवाची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. यामुळे नव्याने उत्पत्ती झालेल्या प्राण्यांमध्ये विविध विकार, आजारांचे प्रमाण वाढते. मर्यादेपेक्षा अधिक संख्या झाल्यास प्रशासनाला व्यवस्थापन करणे कठीण जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून प्राणिसंग्रहालयात काही जातींच्या प्राण्याची नियमितपणे नसबंदी केली जात आहे.

नसबंदीसाठी विविध ठिकाणांहून मागणी

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात गेल्या काही वर्षांत प्राण्याची कोणतही नैसर्गिक क्षमता कमी न करता यशस्वीपणे नसबंदी करण्यात आली आहे. संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी नसबंदीचे अनेक प्रयोग यशस्वी केले असल्याने ओडिशा व अन्य पार्कमधून मागणी होते. सोलापूर येथील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांची नसबंदी करण्यासाठीदेखील डॉ. जाधव यांना बोलावण्यात आले आहे.

तेजस-सुबी सिंहांची जोडी देणार लवकरच गुड न्यूज
गुजरातेतील सक्करबाग येथील आशियाई जातीच्या सिंहांची नर-मादीची जोडी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात गेल्या वर्षी दाखल झाली आहे. तेजस-सुबीला येथील वातावरण चांगलेच मानवले असून, सुबी लवकरच पुणेकरांना गुड न्यूज देणार आहे.

प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनासाठी नसबंदी
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये विविध प्रजातींचे अनेक प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांना नैसर्गिक पद्धतीनेचे येथे राहण्याची सुविध उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे काही जातींत मोठ्या प्रमाणात ब्रीडिंग होऊन
झपाट्याने संख्या वाढते. त्यात केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयातील प्राणीसंख्येवर मर्यादा घातली आहे. तसेच प्राण्याची देखभाल व व्यवस्थापनासाठीदेखील काही प्राण्याची नसबंदी करणे आवश्यक आहे.
- डॉ. राजकुमार जाधव,
संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

शेकरू, चिंकारा, रानमांजर, कोल्ह्याच्या प्रजननासाठी प्रयत्न

काळवीट, सांबर, हरिण, नीलगाय, चितळ यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी केली जाते. मात्र, काही नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचे प्रजनन करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले शेकरू, रानमांजर, चौशिंग, चिंकारा, कोल्हा, भोर आणि भेकर, सिंह यांच्या प्रजननासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शेकरूचे अत्यंत कठीण असे ब्रीडिंग यशस्वीदेखील झाले आहे.

Web Title: Wildlife family planning! Rajiv Gandhi Zoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.