माळरानांवर वन्यजीवांचा अधिवास, त्यावर होतेय अतिक्रमण- अधिवास होतोय नष्ट; माणसांच्या घरांसाठी प्राण्यांच्या घरांवर ‘संक्रांत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:40+5:302021-03-22T04:11:40+5:30
माळरानं आणि तेथील वन्यजीव जपावेत, यासाठी ग्रासलँड संस्था काम करत आहे. या संस्थेचे मिहिर गोडबोले म्हणाले,‘‘पूर्वी पुणे जिल्ह्यात सासवड, ...
माळरानं आणि तेथील वन्यजीव जपावेत, यासाठी ग्रासलँड संस्था काम करत आहे. या संस्थेचे मिहिर गोडबोले म्हणाले,‘‘पूर्वी पुणे जिल्ह्यात सासवड, दिवेघाट, वाघापूर, भुलेश्वर पठार, मोरगाव, बारामती, जेजुरी आदी परिसर हा माळरान असल्याने तिथे लांडगे, कोल्हे, तरस, चिंकारा, ससे मोठ्या प्रमाणावर दिसायचे. पण आता हळूहळू माळराने कमी होत असल्याने प्राण्यांची संख्याही कमी होत आहे. त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. सासवडमध्ये खोकड, लांडगा, तरस खूप होते. आता ते कमी झालेत. वाघापूर-सासवडजवळ संपूर्ण नष्ट झाले आहेत. पूर्वी तीन-चार तरस, लांडगे दिसायचे, पण आता दिसत नाहीत. भटकी कुत्री वाढत आहेत, ते या माळरानावरील ससे, हरणे यांची शिकार करतात. त्यामुळे वन्यजीवांचे जीव जात आहेत.’’
——————-
कुठेही वृक्षलागवड नको
सरकारी योजना म्हणजे पडीक जमिनींवर वृक्षलागवड होत असल्याने माळरानाचे वैभव नष्ट होत आहे. माळरानावर झाडे लावणे चुकीचे आहे.
———
रोजगार उपलब्ध व्हावा
पूर्वी माळरानावर मेंढ्या, बकऱ्या चरण्यासाठी त्याची जपणूक होत असे. पण आता रोजगारासाठी इतर पर्याय नाहीत. त्यामुळे माळरानं जपली जात नाहीत. माळरानं जपावीत, यासाठी रोजगाराच्या इतर संधी खुल्या केल्या पाहिजेत.
——————-
काय करायला हवे?
राजस्थानमध्ये काही संस्थांनी मिळून तेथील माळरानं जपणाऱ्या समाजाला रोजगार मिळवून दिला. काही जागा माळरान म्हणून घोषित केल्या. माळरानावरील प्राणीजीवन दाखविणारे टुरिझम सुरू केल्यास तरुण गाइड म्हणून काम करतील. त्यांना रोजगार मिळेल. टुरिस्ट लोकांना स्थानिक जेवण, साधी राहणी या गोष्टींबाबत सांगितले पाहिजे. हा प्रयोग आपल्याकडे व्हायला हवा. तरच माळरानं जपली जातील.
——————-
माळराने तशीच ठेवावीत
सध्या माळरानं कमी होत असल्याने तेथील वन्यजीवदेखील कमी होत आहेत. त्यामुळे माळरानं जपली पाहिजेत. तरच तेथील जैवविविधता वाचेल. माळरानांचे महत्त्व नागरिकांना समजून दिले पाहिजे, त्यासाठी आम्ही ग्रासलँड आणि वन विभागाचे सहकार्य घेऊन काम करीत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.
---------------