जुन्नर येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीवप्रेमींकडून जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 07:55 PM2019-07-24T19:55:14+5:302019-07-24T19:57:43+5:30
शेतात कठडे नसलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत एक २ वर्षे वयाचा कोल्हा पडल्याची घटना घडली.
खोडद : हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवाचीजाळी मळ्यात एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यात वनखात्याच्या कर्मचाºयांना यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , येथील देवाचीजाळी या मळ्यातील शेतकरी तुकाराम चक्कर पाटील यांच्या शेतात कठडे नसलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत एक २ वर्षे वयाचा कोल्हा पडल्याची माहिती वैभव पाटील यांनी नारायणगाव वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे यांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच काळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
काळे यांनी वनमजुर विश्वास शिंदे, नारायण काळे, रेस्क्यू टीमचे अफजल मदारी, मुकसन मदारी यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण केले.
ग्रामस्थांच्या मदतीने दोरखंड विहिरीत खाली सोडून रेस्क्यू टीमचे अफजल मदारी हे स्वत: विहिरीत उतरले आणि त्यांनी कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले. मात्र, भेदरलेला कोल्हा दोरी सोडताच धूम ठोकण्याच्या प्रयत्नात पुन्हा विहिरीत पडला. यानंतर पुन्हा त्याला सुखरूप बाहेर काढले. यावेळी विश्वास शिंदे यांच्या हाताला कोल्ह्याने चावा घेतल्याने त्यांना किरकोळ जखम झाली आहे.
........