वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले; १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 07:15 PM2021-08-18T19:15:25+5:302021-08-18T19:16:22+5:30
कॅमेरा, लेन्स, मोबाईल, ट्रायपॉड, सोन्याच्या अंगढ्या, ब्रेसलेट व रोकड असा १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
पुणे : बाणेर येथील टेकडीवर फोटो काढण्यासाठी गेलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी धमकावून त्यांच्याकडील कॅमेरा, लेन्स, मोबाईल, ट्रायपॉड, सोन्याच्या अंगढ्या, ब्रेसलेट व रोकड असा १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
याप्रकरणी फोटोग्राफर मुकुल मुखर्जी (वय ४०, रा. म्हाळुंगे, बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेर पॅनकार्ड क्लब रोडजवळील टेकडीवर शिवमंदिराचे पायथ्याशी मंगळवारी दुपारी एक वाजता घडली.
मुखर्जी हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात. त्यासाठी त्यांचेकडे कॅमेरा व मोबाईल असून ते कॅमेरा घेऊन बाणेर पॅनकार्ड क्लब रोडजवळील टेकडीवर फोटोग्राफी करण्यासाठी गेले होते. फोटोग्राफी करुन ते बाणेर येथील शिवमंदिराच्या पायथ्याशी आले. त्यावेळी दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी मुखर्जी यांना धमकावले. त्यांच्या कडील कॅमेरा, लेन्स, मोबाईल, ट्रायपॉड, २ सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे ब्रेसलेट व पाकीटामधील ४ हजार रुपये रोख असा १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे तपास करीत आहेत.