पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत
By admin | Published: April 26, 2017 02:53 AM2017-04-26T02:53:38+5:302017-04-26T02:53:38+5:30
गेल्या महिन्यापासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील तापमानाचा पारा चढला असून याचा परिणाम मानवी जीवनावर
पेठ : गेल्या महिन्यापासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील तापमानाचा पारा चढला असून याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. पाण्याच्या, अन्नाच्या शोधार्थ पेठ परिसरात वानराने मानवीवस्तीत प्रवेश केला, तर पक्षीसुद्धा आपली तहान भागविण्यासाठी पाणी असेल तिथे जाऊन आपली तहान भागविताना दिसत आहेत.
सातगाव पठार परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता व अतिउष्णता यामुळे माणसांबरोबरच जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पशुपक्षी व वन्यप्राण्यांच्या जीवाला उष्माघाताने धोका होण्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. वाढत्या उकाड्यामुळे गावात व शिवारातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगावातील तापमान जवळजवळ ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकत असून या भागातील बहुतांशी विहिरी या पूर्णपणे आटल्या आहेत. या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वानर फिरत आहे. पेठ येथील मानवीवस्तीत हे वानर कधी कधी आढळून येत आहे. प्राण्यांबरोबरच पक्ष्यांनादेखील पाण्याची अधिक गरज भासते. अन्नपाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांना वेळेत पाणी मिळाले नाही तर ते बेशुद्ध पडत आहेत. चिमणी, कावळा यांसारख्या पक्ष्यांना वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे अवाहन पक्षीप्रेमी मित्रांकडून केले जात आहे.