तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:27 PM2019-04-01T23:27:39+5:302019-04-01T23:27:51+5:30
चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना ...
चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी तळे खोदण्यात आले आहे. याच तळ्यात पाणी पिण्यासाठी मोरांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांना इतरत्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
एकीकडे, शासन १३ कोटी वृक्षलागवडीसाठी संकल्प करीत आहे. तसेच, वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून विविध उपाययोजना राबवून जनजागृती करीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. चासकमान परिसरातील मिरजेवाडी, भावडी परिसरात कुदळेवाडीच्या जंगलात अज्ञात व्यक्तीकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे.मात्र, मिरजेवाडी, कुदळेवाडीच्या जंगलात वृक्षांची मोठ्या प्रमाणात सर्रास अज्ञात व्यक्तीकडून कुºहाडीचे घाव घालून कत्तल केली जात आहे. तर, अनेक झाडे निम्म्याहून अधिक कापून अर्धी, जीर्ण करून ठेवली आहेत.
पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता चासकमान परिसरातील शेतात वरचे वर दिसू लागला आहे. कोणत्याही प्रतिकूल वातावरणाशी जूळवून घेण्यात तरबेज असलेल्या बिबट्याचा जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय? केवळ जंगली भागात असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षिततेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तसेच मिरजेवाडी, कुदळेवाडी जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्वतंत्र पिजरा लावून संरक्षण सोयीसुविधा देण्याची गरज आहे. कित्येकदा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा येईपर्यंत वेळ घालवण्याऐवजी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पिजरा लावल्यानंतर त्यात बिबट्या सहज अडकेल आणि आपली जबाबदारी संपेल, अशी वन अधिकाऱ्यांना आशा असली, तरी परिस्थिती तशी नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
बिबट्याला पकडल्यानंतर निसर्गात मुक्त करावे लागत असते. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.