वन्यप्राण्यांची पाण्याची वणवण थांबणार
By admin | Published: April 25, 2017 03:54 AM2017-04-25T03:54:12+5:302017-04-25T03:54:12+5:30
वीसगाव खोऱ्यातील वन्यप्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने डोंगर परिसरात बशीतळी व प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये वन विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे़
नेरे : वीसगाव खोऱ्यातील वन्यप्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने डोंगर परिसरात बशीतळी व प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये वन विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे़
वीसगाव खोऱ्यातील डोंगररांगांच्या जंगल परिसरात हरिण, तरस, लांडगे, ससा, मोर, लांडोरी यांसारखे पशुपक्षी व वन्यप्राणी यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे़ वन्यपाणी व पशुपक्षी अन्न व पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेतात़ डोंगरभागात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने प्राण्यांचे, पक्ष्यांचे मोठे हाल होत होते़ याची लोकमतने पाहणी करून वन्यप्राणी, पशुपक्ष्यांची पाण्यासाठी वणवण असे वृत्त दिले होते. याची दखल घेत वनविभागाने त्वरित ठिकठिकाणच्या बशीतळी व जमिनीत गाडलेल्या प्लॅस्टिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे़
यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचे, पक्ष्यांचे पाण्यासाठी सध्या तरी होणारे हाल थांबणार आहेत. बालवडी (ता. भोर) येथील तरुण व ग्रामस्थांनी स्वखर्चाने छोट्या-छोट्या प्लॅस्टिक टाक्या टाकून प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी तळी बनविली आहेत.
बाजारवाडी येथे तयार असलेल्या या टाक्यांत दोन दिवसांत वनविभाग पाणी सोडणार
असल्याचे वनपाल एस़ ए़ काळे यांनी सांगितले़
(वार्ताहर)