Sasoon Hospital: डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांवर कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:50 PM2024-07-23T13:50:52+5:302024-07-23T13:51:31+5:30

ससूनमध्ये निर्दयी डॉक्टरांनी पाय नसलेल्या रुग्णाला अज्ञात स्थळी फेकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय

will action be taken against the ruthless doctors who throw destitute patients to unknown places in sasoon hospital | Sasoon Hospital: डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांवर कारवाई होणार का?

Sasoon Hospital: डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांवर कारवाई होणार का?

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून वादच्या भोवऱ्यात सापडले आहे. ललित पाटील प्रकरण, पोर्शे अपघात प्रकरणावरून ससूनवर असंख्य प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच ससून रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार समोर आणला आहे. ससूनचे डॉ आदी आणि त्यांचे सहकारी या प्रकरणात असल्याचे सांगण्यात आले आहे. 

 रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड हे रस्त्यावरील जखमी लोकांना ससून मध्ये दाखल करून त्यांची सेवा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत. या घटनेवरून रितेश यांनी सांगितले कि,  गेल्या अनेक वर्षांपासून वंचितच्या माध्यमातून रस्त्यावरील जखमी लोकांना ससून मध्ये दाखल करून त्यांची सेवा करत असतो. पण नंतर आमच्या लक्षात आले कि, आम्ही ऍडमिट केलेले रुग्ण गायब होऊ लागले. ससूनच्या डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले कि तुमचे रुग्ण पळून जातात. परंतु आम्हाला काही लोकांनी सांगितलं कि इथले डॉक्टर रुग्णांना अज्ञात स्थळी जाऊन सोडतात. त्यानुसार आम्ही ३ महिन्यांपासून हा सापळा रचला. त्यामध्ये मी स्वतः परवा ससूनच्या आउट गेटला थांबलो. डॉ आदी बाहेर आले. रात्री १ ते दीड ची वेळ होती. बेवारस रुग्ण सोडायचं आहे असे त्यांनी मला सांगितले. त्या रुग्णाला दोन्ही पाय नव्हते. मी म्हणलं कुठं सोडायचा आहे? मी सांगतो कुठं सोडायचा. त्यानंतर तो म्हणाला कि, आमचा एक रिक्षावाला आहे तो हे दरोरोज काम करतो तुम्ही जर केलं तर मी तुम्हाला दररोजचे २, ३ रुग्ण देत जाईल. मी त्याला हो म्हणलं आणि नंबर दिला, त्यानंतर एंट्री गेट मधून गाडी घेतली. डॉ आदी एका सहकाऱ्यासोबत रुग्णाला घेऊन आले. ससूनच्या मागच्या बाजूला पाण्याची टाकी असते तिथे सीसीटीव्ही नाही. रुग्ण रिक्षात ठेवला. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे पुढे जात होते. मला मागे यायला सांगितलं होत. त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या अलीकडे वडाच्या झाडाशेजारी अंधाऱ्या जागेत रुग्ण फेकून दिला. 

पुढे दादासाहेब गायकवाड यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये रुग्णाला वाचवले. ते म्हणाले, रात्री २ वाजून १० मिनिटांनी मी गेलो. रात्रीच्या अंधारात इतक्या आतमध्ये ज्या ठिकाणी कोणीही पोहचु शकणार नाही अशा ठिकाणी रुग्णाला टाकले होते. त्या रुग्णाचा जीव वाचवणे महत्वाचे होते. आम्ही १०८ ला फोन करून त्या रुग्णाला ऍडमिट केलं. तो रुग्ण पूर्णपणे कमजोर होता. त्याला बोलता येत नव्हतं, आम्ही जर वेळेवर गेलो नसतो. तर त्याचा मृत्यू झाला असता. त्याच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पण तो बोलण्याचा अवस्थेत नव्हता. या घटनेनंतर डॉक्टर आणि या प्रकरणाशी संबंधित कर्मचारी सगळ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे. 

डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकून देणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. ससूनमध्ये याआधीही रुग्णांच्या जीवाशी खेळ झाले आहेत. अक्षरश काहींना तर जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रकरणे तर दाबली गेली आहेत. आताच्या ललित पाटील आणि पोर्शे अपघात प्रकरणानंतर ससूनवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीये. या प्रकरणाशी संबंधित असणारे डॉक्टर, कर्मचारी तो रिक्षावाला यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.   

Web Title: will action be taken against the ruthless doctors who throw destitute patients to unknown places in sasoon hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.