...तर शेतकरी कंपन्याही बंद पडतील - सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:57 AM2018-05-07T02:57:40+5:302018-05-07T02:57:40+5:30
शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.
इंदापूर - शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.
महाएफपीसी व नाफेड यांच्या तर्फे भीमाव्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा खरेदी २०१८ चा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.
आपल्या भाषणात देशमुख म्हणाले की, काही कंपन्या केवळ शेतकºयांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विश्वासाने शेतकरी उत्पादन कंपन्या काढल्या गेल्या त्या विश्वासाला तडा जातो आहे. आपण मध्यस्थ आहोत याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले की, चांगली भूमिका घेतली तर शेतकºयांची वाट लागणार नाही. चुकीची भूमिका घेतली तर शेतकरी अडचणीत येणार आहेत. कर रूपाने सरकारला भरलेला आपला पैसा मातीत जाण्याची शक्यता आहे. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, योगेश थोरात यांची
भाषणे झाली.
परवाना रद्द करावा
बाजार समित्यांनी शेतकºयांकडून कमिशन कापून घेवू नये, असा आदेश शासनाने काढला आहे. तरी देखील वेगळ्या पद्धतीने कमिशन कापण्याचा प्रकार बाजार समित्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कमिशन एजंटांवर कठोर कारवाई करावी. त्याचा परवाना रद्द करावा, अशी सूचना देशमुख यांनी दिली.
भाव वाढू द्या;
खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका!
कांद्याचे भाव थोडा जरी वाढला तरी कांदा खाताना डोळ्यात पाणी येवू लागले, असे पत्रकार लिहितात. वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय होईल शरीराचं, काही नाही.
जैन समाज तर कांदाच खात नाही. जे कांदा खावून रडतात ना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. त्यांना सल्ला द्या कांद्याचा भाव वाढू द्या; खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका.
शेतकºयाला चांगला भाव मिळत असेल तर मिळू द्या,
असा सल्ला सहकार मंत्री देशमुख यांनी दिला.