खरंच माझ्यासाठी कोणी पुढे येईल का? एलएलबी तृतीयपंथीला प्रॅक्टिससाठी वकील मिळेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:50 AM2022-09-22T11:50:44+5:302022-09-22T11:50:55+5:30
मी तृतीयपंथी असल्यानेच काही नामांकित विधिज्ञांनी मला सराव करण्यासाठी नकार दिला
सतीश गावडे
माळेगाव : बारामतीच्या तृतीय पंथी श्रेया साळवे यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कायद्याची पदवी घेतली. मात्र, सराव करण्यासाठी नामवंत विधिज्ञ तज्ज्ञांनी नकार दिल्याने सरावाशिवाय मी कशी वकील होणार, ही चिंता साळवे यांना भेडसावत आहे. सराव करण्यासाठी मदत करण्यासाठी खरंच कोणी पुढे येईल का, असा सवाल त्यांनी केला आहे.
माळेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना साळवे यांनी ही खंत व्यक्त केली आहे. मला समाजाकडून हीन आणि दुय्यम वागणूक मिळते. बारामती येथे वास्तव्य करणाऱ्या तृतीय पंथीय श्रेया गोपाळ साळवे यांनी बारामती येथे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. ही पदवी घेतल्यानंतर नामवंत विधिज्ञांकडे सराव केला जातो. सरावानंतरच वकिली व्यवसाय जोमाने करता येतो. मात्र, सध्या व्यवसाय नसल्याने हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. वेळप्रसंगी दुकान गाळ्यांमधून पैसे मागून चरितार्थ चालवावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मी तृतीयपंथी असल्यानेच काही नामांकित विधिज्ञांनी श्रेया यांना सराव करण्यासाठी नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. वकिली व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सराव हा महत्त्वाचा भाग आहे. चांगला विधिज्ञ उत्तम सराव करून घेतो. याचा उपयोग नवीन पदवी घेणाऱ्याला फायदा होतो. त्याला स्वत:च्या व्यवसायासाठी याचा उपयोग होतो.
एकीकडे शासन तृतीपंथींना सन्मान मिळावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. दुर्दैवाने समानतेच्या पोकळ गप्पा मारणारे तथाकथित तृतीपंथींना तशी वागणूक देत नाहीत. तीच गत श्रेयाची असून कायद्याची पदवी घेऊनसुद्धा तिला सरावासाठी याच कायद्याचा उपयोग करावा लागणार आहे.
''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून मी कायद्याची पदवी घेतली. शिक्षण घेताना काहीच अडचण आली नाही. मात्र, सरावासाठी मी तृतीयपंथी असल्याने नकार मिळत असल्याने खंत वाटते. - ॲड. श्रेया साळवे''