पूर्व हवेलीतील अनधिकृत शाळांची घेईल का कोणी दखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:19+5:302021-08-15T04:13:19+5:30

थेऊर : शालेय शिक्षण विभागाची मान्यता न घेता दरवर्षी शाळा सुरू करण्यात येतात. त्यांचा शोध घेऊन त्याची यादी शिक्षणाधिकाऱ्यांनी ...

Will anyone take notice of unauthorized schools in East Haveli! | पूर्व हवेलीतील अनधिकृत शाळांची घेईल का कोणी दखल!

पूर्व हवेलीतील अनधिकृत शाळांची घेईल का कोणी दखल!

Next

थेऊर : शालेय शिक्षण विभागाची मान्यता न घेता दरवर्षी शाळा सुरू करण्यात येतात. त्यांचा शोध घेऊन त्याची यादी शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर करणे आवश्यक असते. मागील दोन वर्षांपासून शाळेची घंटा वाजलेली नसताना या अनधिकृत शाळा मात्र पालकांच्या खिशाचा घास मात्र मोठ्या चवीने घेत असल्याचे चित्र सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

राजकीय पुढारी, उद्योजक, व्यापारी हे नवीन शाळा सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आवश्यक त्या मान्यता न घेता शाळा सुरू करतात. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारणी होते. विद्यार्थ्यांचे प्रवेश होईपर्यंत दर्जेदार सुविधा पुरविण्याची केवळ पोकळ आश्वासने देतात. नंतर त्याची अंमलबजावणी होत नाही. काही कालावधीनंतर शाळा अनधिकृत असल्याची माहिती पालकांना मिळाल्यानंतर डोकेदुखी वाढते. त्यामुळे कोणत्या शाळा अधिकृत व अनधिकृत आहेत याची माहिती शिक्षण विभागाकडून पालकांना मिळणे आवश्यक असणे गरजेचे असते. पालक संघटनांकडून अनधिकृत शाळांबाबत तक्रारी केल्यानंतरही संबंधित शाळांवर ठोस कारवाई होत नाही. यामागे नेमके कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत याबाबत दबक्या आवाजात चर्चा परिसरातील पालकांमध्ये सुरू असून जर शाळाच अनधिकृत असतील तर याची कल्पना शिक्षण विभागाने आम्हाला देणे गरजेचे होते, असे आमच्या मुलांच्या भवीतव्याशी खेळणे योग्य आहे का असा प्रतिसवाल पालक विचारत आहेत. एकीकडे वाड्या वस्त्यांवर पायपीट करत जाऊन विविध उपक्रम राबवत विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे शिक्षक दिसतात तर दुसरीकडे स्वतःचा सर्वांगीण विकास करणारे हे संस्थाचालक दिसत आहेत.

परिसरातील या अनधिकृत शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून या खासगी शाळांपेक्षाही दर्जेदार शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत दिले जाते, परंतु पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत खाजगी शाळा पोकळ आश्वासने देत या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश देतात. या शाळांवर शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलला की हे संस्थाचालक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा आसरा घेत सहीसलामत यातून बाहेर पडत असतात. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती हवेली. रामदास शिवनाथ वालझाडे यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी हवेली तालुक्यातील २०२१-२२ मधील एकूण १७ अनधिकृत शाळांची नावांची यादी पोहच केली त्यातील पूर्व हवेलीमधील एकूण चार शाळा पुढीलप्रमाणे

पूर्व हवेलीमधील अनधिकृत शाळांची नावे:१)श्रीम. सुलोचनाताई झेंडे प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, ता. हवेली

२)युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी संचलित, पुणे इंटरनॅशनल स्कुल, लोणी काळभोर.

३)वाघ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे स्कुल टायग्रीस कप स्कुल, कदमवाकवस्ती

४)श्री समर्थ सोशल एज्युकेशन सोसायटीचे स्कायलॅब इंग्लिश मिडीयम स्कुल,कदमवाकवस्ती

रामदास शिवनाथ वालझाडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती हवेली.

हवेली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत शाळांची यादी बनवून आम्ही ती वर पाठविली असून योग्य ती कार्यवाही या शाळांवर आम्ही करू.

Web Title: Will anyone take notice of unauthorized schools in East Haveli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.