"मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहील, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही" पुण्यातील फ्लेक्सने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:32 PM2024-04-01T13:32:47+5:302024-04-01T13:40:47+5:30
पुण्यात एक असा एक फ्लेक्स लावण्यात आला आहे जो नेते मंडळीला नक्की चिमटा काढून जाईल.....
पुणे : आजवर तुम्ही अनेक राजकीय फ्लेक्स पाहिले असतील कधी नेत्यांच्या वाढदिवसाचे तर कधी राजकारण्यांच्या कुठल्या पदाच्या नियुक्तीचे. पण पुण्यात एक असा एक फ्लेक्स लावण्यात आला आहे जो नेते मंडळीला नक्की चिमटा काढून जाईल.
लोकसभा निवडणुकीमुळे पुणे शहरातील इच्छूकांनी आणि विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारास सुरूवात केली आहे. अशामध्ये शहरातील मध्यभागी असणाऱ्या परिसरातील एका फ्लेक्सचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फ्लेक्सवर लिहले आहे की, "मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहील, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी हमी उमेदवारांनी द्यावी तरच त्याला मतदान केलं जाईल असा पुणेरी सल्ला या फ्लेक्स मधून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फ्लेक्स कोणी लावला कधी लावला हे मात्र समजू शकलेले नाही.
"मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहील, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही" पुण्यातील फ्लेक्सने वेधले लक्ष#Punepic.twitter.com/EAMHyawe13
— Lokmat (@lokmat) April 1, 2024
पुणे लोकसभा निवडणुकीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर मैदानात उतरले आहेत. तर वसंत मोरेंच्या रुपाने तिसरा उमेदवारही या निवडणुकीत दिसू शकतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर काँग्रेसने त्यांना संधी दिली. तर भाजपमधील इतर इच्छूकांवर मात करत मोहोळांनी भाजपकडून तिकिट मिळवले.