बोलीभाषेच्या माध्यमातून होणार ‘‘राष्ट्रभक्तीचा’’ जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 08:42 PM2018-11-19T20:42:21+5:302018-11-19T20:52:42+5:30
राज्याचे हे भाषासंचित टिकून राहावे याकरिता राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात ‘‘बोलीभाषेच्या’’ माध्यमातून राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे.
पुणे : भाषेला सीमांचे बंधन असते. सीमा ओलांडली की भाषेचा बाज, थाट, सगळे बदलते. मराठी भाषेला तर अशा वेगवेगळ्या भाषां भगिनी लाभलेल्या आहेत. घाटावरची भाषा, देशावरची भाषा, व-हाडी भाषा, खानदेशी भाषा, यांच्या माध्यमातून भाषा जिवंत राहते. गेल्या काही वर्षांपासून भाषेवर विविध सांस्कृतिक आक्रमणे झाल्यानंतर भाषेचे वैभव काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती भाषातज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे राज्याचे हे भाषासंचित टिकून राहावे याकरिता राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात ‘‘बोलीभाषेच्या’’ माध्यमातून राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे.
कर्नाळा चँरिटेबल ट्रस्ट पुणे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृ ती मंडळाच्यावतीने येत्या 25 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. अशातच भाषेच लेणं असलेल्या बोलीभाषेच्या संवर्धन आणि समृध्दीकरिता देखील काही साहित्यिक संस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही या संमेलनाची मुख्य संकल्पना आहे. महाराष्ट्रातील बोली भाषेतुन भाषाविषयक जागृती आणि प्रबोधन संमेलनातून केले जाणार आहे. राज्यात एकूण 94 बोलीभाषा आहेत. त्यापैकी 52 बोलीभाषांना मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा याकरिता हातभार लावण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. मराठी भाषेतले आद्यकवी मुकूंदराज हे देखील झाडी बोलीभाषेतून आपल्या रचना करत. चंद्रपूरची राजभाषा देखील झाडी ही बोलीभाषा होती. चांदा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा यासारख्या भागात बोलली जाणा-या या भाषेसह अन्य विदर्भीय बोलीभाषांचा संबंध राष्ट्रभक्तीच्या साथीने उलगडला जाणार आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान याठिकाणी होणा-या या संमेलनाचे अध्यक्षस्थान पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे भुषविणार आहेत.
पाश्चिमात्य भाषांचे आपल्याकडे झालेल्या अतिक्रमणामुळे मुळ मराठी भाषेच्या स्वरुपात झालेला बदल, त्याचा पर्यायाने मराठी बोलीभाषेवर झालेला परिणाम यासगळ्या प्रश्नांची उत्तरे यानिमित्ताने शोधली जाणार आहेत. पर्यावरणाची गंभीर समस्या सध्या असून त्याविषयी जनमाणसात जागृती आणणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. मात्र त्याबरोबरच ऐरणी, कोकणी, गोंड, माडी, व-हाडी भाषेचा गोडवा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याकरिता या साहित्य व्यासपीठाचा उपयोग केला जाणार असल्याची भूमिका नाईकडे यांनी यावेळी व्यक्त केली. संमेलन काळात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादातून जे ठराव मांडण्यात येतील ते राज्यसरकारकडे पाठविण्यात येवून त्याची वेळोवेळी दखल घेतली जाणार आहे.
................................
*संमेलनात मराठीच्या बोलीभाषा यात राष्ट्रभक्तीचा मानबिंदु झाडीबोली व अन्य वैदर्भीय बोलीभाषा यावर प्रा.डॉ.हरिश्चंद्र बोरकर, प्रा.ना.गो.थुटे बोलणार आहेत. कोकणी बोलीचा राष्ट्रभक्ती प्रेरक इतिहास प्रा.विनय मडगांवकर मांडणार असून डॉ.रमेश सुर्यवंशी हे अहिराणी बोलीभाषेतील राष्ट्रीय अविष्कार यावर मार्गदर्शन करणार करणार आहेत. विशेष म्हणजे अभ्यासक प्रमाणभाषे बरोबरच संबंधित बोलीभाषेतच विचार व्यक्त करणार असल्याने भाषाअभ्यासक, मराठी वाचक, रसिकांना आगळी पर्वणी असणार असल्याचे संमेलनाचे आयोजक चंद्रकांत शहासने यांनी सांगितले.