जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार; पोलीस ‘अॅक्शन’ मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:17+5:302021-07-25T04:11:17+5:30
बारामती : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार बारामती शहर ...
बारामती : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल असलेल्या लाला पाथरकर याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
लाला आत्माराम पाथरकर (रा. इंदापूर रोड, आमराई, बारामती) याच्यावर सन २००१ पासून बारामती शहर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण, शासकीय कामात अडथळा आणणे, आदी विविध गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. शिवाय सन २०१७ मध्ये शहर पोलिसांकडून मुंबई पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. सदर कारवाई चालू असताना पाथरकर याने जबरी चोरी, गर्दी, मारामारीसारखे गुन्हे केले आहेत. तसेच २०१९ मध्ये ही शहर पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे ३ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. या काळातही त्याने खंडणी व सरकारी कामात अडथळा असे गुन्हे केले आहेत. त्याच्या दहशतीमुळे अनेक लोकांनी त्याच्याविरोधात घडलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिसांत तक्रारी दिल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पाथरकर याच्यावर कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांकडून आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्यासाठी बेरोजगार व अशिक्षितांंकडून आर्थिक फायद्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करण्याची मानसिकता तयार होत आहे. त्यातूनच वाढत जाणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे भाई, दादा, भाऊचा उगम होत असून त्यांची सर्वसामान्यांवर दहशत व त्याद्वारे विनासायास मिळणारा पैसा यामुळे हा वर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षिला जात आहे. त्याचा फायदा सराईत गुन्हेगार घेत असून त्यांच्या मदतीने सराईत गुन्हेगार परिसरात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटित टोळ्या कार्यरत करून जबरी चोरी, गर्दी, मारामारी, खंडणी सरकारी कामात अडथळा आणणे, आदी गुन्हे करतात. या कृत्यांना वेळीच प्रतिबंध करणे व नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले आहे. त्या अनुषंगाने बारामतीतील कुप्रसिद्ध लाला पाथरकर याच्यावर एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून कारवाई करून त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्धत करण्यात आले आहे.
-------------
४ टोळ्यांतील ३१ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई....
पोलिसांनी ऑक्टोबर २०२० पासून आजपर्यंत १७ टोळ्यातील ७४ जणांवर हद्दपारीची कारवाई केली असून, १२ टोळ्यांतील ६५ जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंद पत्र घेतले आहे. तसेच भिगवन, रायगड, आळेफाटा, शिरूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळू ऊर्फ जगदीश पोपप दराडे, आप्पा ज्ञानदेव माने, राहुल अर्पण भोसले, नीलेश ऊर्फ नानू ऊर्फ नाना चंद्रकांत कुर्लप यांच्या संघटित गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकामी ४ टोळ्यांतील ३१ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल आहे. तसेच नीलेश बन्सीलाल घायवळ व गजानन पंढरीनाथ मारणे या २ धोकादायक व्यक्तींवर यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
--------------
भविष्यात मोक्का स्थानबद्धतेची होणार कारवाई...
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांचा वावर वाढल्याने वेळीच ग्रामीण पोलीस कार्यरत होऊन लाला पाथरकर याच्यावर स्थानबद्धतेची कडक कारवाई केली असून, गुन्हेगारांवर वचक निर्माण केली आहे. भविष्यातही सराईत गुन्हेगार संघटित टोळ्यांवर हद्दपार, मोक्का स्थानबद्धत अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
---------------