एका मिनिटांत हजारो वाहने जाणाऱ्या चांदणी चौकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार का?
By नितीश गोवंडे | Published: September 15, 2022 01:49 PM2022-09-15T13:49:50+5:302022-09-15T13:50:07+5:30
चांदणी चौकात उपाययाेजना अनेक, परिणाम मात्र शून्यच
पुणे : वाहतूक काेंडीचा हाॅटस्पाॅट ठरलेला चांदणी चाैक. वेळ हाेती बुधवारी संध्याकाळी सहा ते आठ दरम्यानची. मागील काही दिवसांपासून अनेक उपाययाेजना करूनही वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ हाेती. या पुलावरील वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळवली तरी परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री अडकले अन् प्रशासनाला खडबडून जाग आली. या चौकातून मुंबईहून साताऱ्याकडे, पौंड, बाणेर, बावधन, मुळशी, भुगाव, ताम्हिणीकडे जाण्याचा रस्ता आहे. याव्यतिरिक्त हिंजवडी येथे दररोज ये-जा करणाऱ्या चाकारमान्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे या चौकातील दररोजची वाहतूक कोंडी ही प्रत्येकालाच त्रासदायक ठरली होती. यातून मार्ग काढण्यासाठी चांदणी चौकातील एनडीए-पाषाण पुलाजवळ बॉटलनेक असल्याने तो पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हे आहे चित्र
- एनडीए-पाषाण पूल पाडणार असल्याने पुण्याहून पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना दोन किमी पेक्षा अधिक वळसा घालून जावे लागत आहे.
- मुंबईहून येणारी वाहतूक आणि मुळशीकडून येणारी वाहतूक एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारीही अपुरे पडत असल्याचे दिसून आले.
- मुंबईहून चांदणी चौकात येत असताना मुळशीहून आलेल्या पुलाखाली वाहनांची गर्दी होत आहे. त्यातच पुण्याकडून बावधनकडे जाणारी वाहने पुलावरून वळण घेऊन येत असल्याने या कोंडीत मोठी भर पडत आहे.
- एका मिनिटात साधारण १५०० वाहनांपेक्षा अधिक वाहने या परिसरातून जात असल्याने नवीन पूल उभारल्यावरही वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होणार का, हा खरा प्रश्न आहे.
वाहनचालकांमध्ये संभ्रम
- पुण्याहून बावधनकडे कसे जावे यासाठी कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नसल्याने, वाहनधारकांचे हाल.
- रात्री चांदणी चौक परिसरातील रोडवर लाईट नसल्याने रिफ्लेक्शन लावण्याची गरज.
- परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर.
- मुंबईहून आलेल्या वाहनाला बावधनकडे वळता येत नसल्याने वाहनचालक संभ्रमात.