चंद्रकांत पाटील यांना नियम लागू हाेणार की अपवाद ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 02:57 PM2022-07-06T14:57:04+5:302022-07-06T14:57:44+5:30
पहिला अडथळा पक्षाचे ‘एक व्यक्ती, एक पद’ हे धाेरण...
-राजू इनामदार
पुणे : राज्यातील सत्तास्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदासमोर अडसर निर्माण झाला आहे. यातील पहिला अडथळा पक्षाचे ‘एक व्यक्ती, एक पद’ हे धाेरण आहे. त्यानुसार पाटील यांच्याकडे पक्षाध्यक्षपद कायम राहील किंवा मंत्रिपद मिळेल. सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी पाटील यांच्याकडे पक्ष संघटनेचीच जबाबदारी साेपविण्याची शक्यता आहे.
या पुढच्या काळात सलग निवडणुका हाेऊ घातल्या आहेत. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या संपतात ना संपतात ताेच लाेकसभा, विधानसभा निवडणुकींना सामाेरे जावे लागणार आहे. या सर्व निवडणुका शिवसेनेतील बंडखोर गटाला बरोबर घेत लढाव्या लागणार असल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून वरिष्ठ व्यक्तीला पक्षसंघटनेचीच जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनाच पक्षसंघटनेत सक्रिय राहण्याचे आदेश दिले जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काहींच्या मते, आगामी मुंबई महापालिका निवडणूक डाेळ्यांसमाेर ठेवून आशिष शेलार यांना पक्षसंघटनेची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेनेबरोबर दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाले तेव्हा भाजप मोठा भाऊ, तर शिवसेना लहान अशी वर्गवारी झाली. भाजपला राज्यात संघटन वाढवण्याची गरज भासत होती. अशा वेळी पाटील वरदान ठरू शकतात या विचाराने त्यांना पक्षात आणण्यात आले. मंत्रिपदाबरोबरच प्रदेशाध्यक्षपदाची माळही त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यांनीही त्या काळात पक्षसंघटनेत काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना हजारी पन्ना, बूथ कमिटी, मतदार संपर्क अभियान, सदस्य नोंदणी अभियान असे वेगवेगळे कार्यक्रम देत पक्षाच्या संघटनेला ताकद दिली. आता पुन्हा एकदा तीच गरज असताना पाटील यांना मंत्रिपदात अडकवले जाण्याची शक्यता कमी दिसते, असे भाजपमधीलच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
...की दाेन्हीही पदे मिळणार?
शिवसेनेतून बंड करून भाजपसाेबत आलेल्या एकनाथ शिंदे गटाबरोबर बोलणी करणे, त्यांना गुंतवून ठेवणे हे काम चंद्रकांत पाटील चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपदात अडकवून ठेवायचे की प्रदेशाध्यक्षपदीच कायम ठेवायचे, अशी चर्चा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती समाेर येत आहे. मंत्री व प्रदेशाध्यक्ष अशा दोन पदांवर एकाच व्यक्तीला ठेवायचे का? की ‘एक व्यक्ती - एक पद’ या नियमास पाटील यांचा अपवाद करायचा, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. हेच कारण सांगून त्यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवता येणे शक्य आहे, असेही बोलले जात आहे. मंत्री केले, पुण्याचे पालकमंत्री केले की ते तिथेच अडकून पडतील. पक्षाच्या राज्यातील वर्चस्वासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दुर्लक्ष होईल, असे काही नेत्यांचे मत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.