छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकारच करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:05+5:302021-07-30T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल यांचे स्मारक मला कोठेही दिसले नाही. त्याबद्दल मी एकाला विचारले असता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल यांचे स्मारक मला कोठेही दिसले नाही. त्याबद्दल मी एकाला विचारले असता ‘चर्चिल आमच्या रक्तामध्ये असताना स्मारकाची गरजच काय?’, असा प्रतिप्रश्न त्यांंनी मला केला. त्याचप्रमाणे ‘छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तामध्ये आहेत का? की केवळ जयजयकार करण्यातच आम्ही धन्यता मानणार?,” असा सवाल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित केला. ‘शिवाजी महाराजांच्या अलौकिक गुणांनी मी भारावून गेलो. म्हणूनच मी आयुष्यभर त्यांचे चरित्र सांगत राहिलो’, अशी कृतार्थ भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
शिवशाहीर पुरंदरे यांनी गुुरुवारी (दि. २९) वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शताब्दी महोत्सव समितीतर्फे पुरंदरे यांच्या अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. याप्रसंगी गोवा मुक्ती संग्रामातील पराक्रमावर आधारित चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, दत्तोपंत हडप गुरुजी यांनी केलेले मंत्रपठण, नात राधा पुरंदरे-आगाशे आणि पल्लवी जाधव यांनी शंभर दिव्यांनी केलेले औक्षण यामुळे वातावरण प्रसन्न झाले.
डॉ. मोरे म्हणाले, “बाबासाहेबांनी शिवछत्रपती हाच ध्यास घेतला. ‘शिवरायांचे आठवावे रूप’ असे समर्थांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून बाबासाहेबांनी ‘शिवरायांचे दाखवावे रूप’ हा प्रयत्न आयुष्यभर केला. शिवचरित्राला नाट्यरूप देत ‘जाणता राजा’ महानाट्य आणि सृष्ट रूप देत शिवसृष्टी साकारली.” डॉ. करमळकर, सागर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. अभिषेक जाधव यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विशाल सातव यांनी आभार मानले.
चौकट
एक तरी गुण घ्यावा
“छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जयजयकार करतो. पण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक तरी गुण अंगी बाणवतो का? शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द मोडला किंवा दिलेली वेळ पाळली नाही, असे कधी झाले नाही. त्यांच्या या गुणाचे आचरण करता येईल असे मला वाटले. पण, यामध्येही मी जेमतेम ६० टक्क्यांनी उत्तीर्ण झालो.”
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
चौकट
“बाबासाहेबांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवचरित्रावर आधारित शंभर कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. बाबासाहेबांच्या कार्यावर लघुपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.”
- मुरलीधर मोहोळ, महापौर
----------------