क्रेडिट सिस्टीम राहणार कागदावरच? प्राध्यापकांकडून भीती व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:00 PM2019-09-10T14:00:19+5:302019-09-10T14:04:05+5:30
केवळ विज्ञान शाखेच्याच नाही तर कला,वाणिज्यसह इतरही शाखेच्या क्रेडिट सिस्टीमसंदर्भात प्राध्यापकाच्या मनात अनेक शंका आहेत.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे चालू शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्यात आली आहे .मात्र,या सिस्टीमची अंमलबजावणी करताना येणाऱ्या त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.अन्यथा क्रेडिट सिस्टीम कागदावरच राहिल,अशी भीती प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठातर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज 30 सप्टेबरपर्यंत स्वीकारले जातात. त्यामुळे सप्टेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही काही महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, क्रेडिट सिस्टीम स्वीकारल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे अंतर्गत मुल्यमापन करणे आवश्यक झाले आहे. उशिरा प्रवेश घेतलेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याचे 16 प्रॅक्टिकल घेणे आणि त्याचे जनरल पूर्ण करून घेणे शक्य नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना क्रेडिट सिस्टीमध्ये कसे सामावून घ्यावे, याबाबत प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जास्त तास घेवून किंवा संबंधित विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा,असा सल्ला विद्यापीठातील अधिका-यांकडून दिला जात असला तरी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या अपुऱ्या संख्येमुळे हे शक्य होत नाही,असेही प्राध्यापकांकडून सांगितले जात आहे.
केवळ विज्ञान शाखेच्याच नाही तर कला,वाणिज्यसह इतरही शाखेच्या क्रेडिट सिस्टीमसंदर्भात प्राध्यापकाच्या मनात अनेक शंका आहेत.विद्यापीठाने आवश्यक पूर्व तयारी न करताच क्रेडिट सिस्टीम राबविली,असा आरोप प्राध्यापक संघटनेकडून केला जात आहे. तसेच विद्यापीठाने अंमलबजावणीतील तृटी दूर कराव्यात अशी मागणीही प्राध्यापकांकडून केली जात आहे.
--------------
चॉईस उपलब्ध करून देणे हा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा आत्मा आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कला,वाणिज्य शाखेचे विषय घेऊन क्रेडिट मिळवता आले पाहिजेत. तसेच कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे विषय घेऊन क्रेडिट मिळवण्याची संधी उपलब्ध असली पाहिजे. मात्र,सध्या ग्रामीण व काही शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये अशी संधी उपलब्ध नाही.त्यामुळे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम कागदावरच राहणार आहे.
-एस.पी.लवांडे,सचिव,एम.फुक्टो
-------------
क्रेडिट सिस्टीम राबविण्यापूर्वी विद्यापीठाने आवश्यक तयारी करायला हवी होती. ही सिस्टीम नियमीत चालणारी प्रक्रिया आहे.त्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेपूर्वी काही दिवस आधी प्रथम वर्षास प्रवेश देणे योग्य ठरणार नाही.संबंधित विद्यार्थ्याला नियमाप्रमाणे क्रेडिट देणे शक्य होत नाही.त्यातच महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.शासनाने व विद्यापीठाने प्रथम वर्षाचे प्रवेश जुलै महिन्यापर्यंतच दिले जातील,असा बदल करणे गरजेचे झाले आहे.अन्यथा क्रेडिट सिटीम कागदावरच राहिल.
-एस.एम.राठोड ,अध्यक्ष,पुटा,