आमदार कुल यांच्या माध्यमातून दौंडला मिळणार पहिला लाल दिवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:59 PM2022-06-30T13:59:30+5:302022-06-30T14:27:57+5:30

फडणवीस आश्वासन पाळणार का?...

Will Daund get the first minister through MLA rahul Kul bjp new government | आमदार कुल यांच्या माध्यमातून दौंडला मिळणार पहिला लाल दिवा?

आमदार कुल यांच्या माध्यमातून दौंडला मिळणार पहिला लाल दिवा?

googlenewsNext

केडगाव (पुणे) : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात भाजपाचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल यांना भाजप सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेमध्ये आमदार राहुल कुल यांना निवडून द्या त्यांना मंत्रीपद देण्याचे जबाबदारी माझी असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. फडणवीस आश्वासन पाळणार का? अशी चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दौंडला अद्याप मंत्री रूपातून लाल दिवा मिळाला नाही. गेली ८ वर्षांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून राहुल कुल यांची ओळख आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे ग्रामीण मधील भाजपमध्ये एकमेव राहुल कुल हे आमदार म्हणून विजयी झाले आहेत. राहुल कुल यांचा दौंड मतदारसंघ पवारांच्या बारामती मतदार संघाच्या शेजारीच आहे.

तसेच २०१९ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना मैदानात उतरवले होते. त्यावेळी कांचन कुल यांचा पराभव झाला होता. मुळशी धरणाचे पाणी, भीमा पाटस कारखाना या महत्त्वाच्या विषयांमध्ये फडणवीस यांनी वेळोवेळी कुल यांना मदत केली आहे. कुल यांच्या घरामध्ये २००९ ते २०१४ चा अपवाद वगळता १९९० पासून २८ वर्ष आमदारकी आहे. आमदार कूल यांचे वडील दिवंगत सुभाष अण्णा कुल, आई रंजना कुल यांनी  दौंड विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु अद्याप दौंडला मंत्रिपद मिळाले नाही.

राहुल कुल यांची आमदार म्हणून दुसरी टर्म चालू आहे. या टर्ममध्ये विरोधी पक्ष असताना विधानसभेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला. एक अभ्यासू, प्रगल्भ, दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोविड महामारी मध्ये केलेले काम, आरोग्य दूत म्हणून असणारी त्यांची ओळख जिल्हाभर आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी मतदान प्रतिनिधी म्हणून कुल यांची निवड केली होती. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गोव्यावरून मुंबईत आणण्याची जबाबदारी आमदार कुल यांच्यावरती देण्यात आली होती. थोडक्यात कुल हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी ओळखले जातात. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये  पवार विरोधी गटाला बळ देण्यासाठी आमदार कुल यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.

Web Title: Will Daund get the first minister through MLA rahul Kul bjp new government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.